कल्याण,
11 killed in accident in Kalyan कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर रायते पुलाजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. काळी-पिवळी प्रवासी वाहतूक करणारी एक लहान मोटारगाडी सिमेंट मिक्सर वाहनावर जोरात आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत घटनास्थळीच अकरा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून सर्वजण मुरबाड परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्राथमिक तपासानुसार, क्षमता कमी असलेल्या वाहनात मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते. सुमारे पाच आसनी वाहनात बारा जण प्रवास करत असल्याचे समोर आले असून त्यामुळे अपघाताची तीव्रता अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.
रायते पुलावर सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाली होती. याच गोंधळात ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांनी प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपूर्ण सुरक्षा व्यवस्था आणि घाईघाईने सुरू केलेल्या पुलामुळे अपघात झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले असून पुढील तपास सुरू आहे.