'शेवटचा इशारा' आणि अमेरिकन युद्धनौकेने बदलला रस्ता

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
तेहरान,
American warship changes course इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेला कोणताही निष्कर्ष न लागल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अधिकच वाढला असून होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात परिस्थिती चिघळली आहे. इराणने अमेरिकेला थेट इशारा देत आपल्या सागरी हद्दीत हालचाली मर्यादित ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या दृश्यांमध्ये इराणी सुरक्षा दल अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेला मार्ग बदलण्याचा आदेश देताना दिसत आहेत. या संवादात इराणी नौदलाच्या जवानाने संबंधित युद्धनौकेला तात्काळ दिशा बदलून परतण्यास सांगितले असून आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.

American warship  
 
इराणकडून सावध राहण्याचे आवाहन
अमेरिकन युद्धनौकेवरील अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आपली हालचाल सुरू असल्याचे सांगत कोणताही संघर्ष निर्माण करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही इराणकडून कठोर भूमिका कायम ठेवत हा शेवटचा इशारा असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर परिसरात आणखी तणाव निर्माण झाला असून इराणकडून इतर जहाजांनाही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इराणी दलांनी युद्धनौकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे निर्देश देत कोणतीही आक्रमक हालचाल झाल्यास कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी यंत्रणेने या भागात सुरुंगमुक्तीची मोहीम सुरू असल्याचे सांगितले असून दोन युद्धनौकांच्या मदतीने ही कारवाई केली जात आहे. या मोहिमेचा उद्देश सागरी मार्ग सुरक्षित ठेवणे असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींमुळे होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणाव अधिक वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील काळात या संघर्षाचे रूपांतर मोठ्या संकटात होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.