वॉशिंग्टन,
America's pressure tactics begin इस्लामाबाद येथे झालेल्या इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव पुन्हा तीव्र झाला आहे. चर्चेचा कोणताही ठोस निष्कर्ष न लागल्यामुळे अमेरिकेने आता होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात लष्करी हालचाली वाढवत सागरी नियंत्रण कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयाने जाहीर केले असून इराणच्या बंदरांभोवती सागरी नियंत्रणाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार हे पाऊल उचलले जात असून या कारवाईचा परिणाम त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या सर्व जहाजांवर होणार आहे. मात्र, इतर देशांच्या बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांच्या मुक्त हालचालीत अडथळा आणला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.या निर्णयामुळे आखाती प्रदेशातील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकन नौदलाने त्या भागात कार्यरत असलेल्या जहाजांना सतर्क राहण्याचे आणि लष्करी संपर्क कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या घडामोडींमुळे जागतिक पातळीवरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, अमेरिकेच्या धोरणात्मक पावलांना प्रत्युत्तर देताना इराणच्या सुरक्षा दलांनी कडक भूमिका घेतली आहे.
इराणने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, या सागरी मार्गावर कोणत्याही प्रकारची आक्रमक हालचाल झाल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. होर्मुझ सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण असल्याचा दावा करत इराणने विरोधकांना सावध राहण्याचा इशाराही दिला आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे प्रदेशात तणाव वाढत असून मोठ्या संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक व्यापार, तेलपुरवठा आणि एकूणच आंतरराष्ट्रीय स्थैर्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.