अग्रलेख....
asha bhosle पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी कुठल्या तरी एका कार्यक्रमात सांगितलेला किस्सा. लतादीदी, मीनाताई या सगळ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमोर गात असायच्या त्यावेळी छोट्या आशा मंगेशकर खेळत-बागडत असायच्या. आईने एकदा दीनानाथांना सांगितले की, या मुली गातात, ही आशा मात्र गात नाही. त्यावर मास्टर दीनानाथ म्हणाले होते की, ती बंदिशी पाठ करीत नाही. गाणे शिकत नाही. पण, सर्व गोष्टींचा तिचा रियाज आतल्या आत सुरू आहे. एक दिवस असा येईल की, ती कुणालाच काहीही लक्षात न येता फार मोठी गायिका म्हणून प्रसिद्ध होईल!...आणि झाले अगदी तसेच. बालपणी खेळण्यात रमलेली, सुरुवातीला फारशी गंभीर न झालेली आशा जागतिक कीर्तीची गायिका बनली आणि तिने अनेक दशके स्वरसम्राज्ञीचे पद भूषविले. गजल, ठुमरी, लावणी, भावगीत, भजन, पॉप-रॅप असे सारे प्रयोग केले. आशा पारेख, मुमताज, साधना, मधुबाला, मीनाकुमारी, झीनत अमान, हेलन ते माधुरी दीक्षित-करिश्मा कपूर-काजोल आणि उर्मिला मातोंडकर यांच्यापर्यंत अनेकींना आशाताईंनी स्वर दिला. अशा आशाताईंचा श्वास रविवारी, 12 एप्रिल रोजी थांबला. हजारो गाणी आणि त्यातील त्यांचा सुरेल आवाज, आर्तता, मादकता, नाद आणि खट्याळपणा हे सारे त्यांनी रसिकांसाठी मागे सोडले आहे. प्रत्येक मानवी भावनेशी निगडित असलेले एक तरी गाणे आशाताईंनी गायिलेले आहे. नऊ दशकांच्या वळणदार आणि संघर्षमय जीवनात सात दशकांहून अधिक काळ संगीताशी नाते कायम ठेवलेल्या आशाताईंची गाणी हे भारतीय संगीतातील फार मोठे संचित आहे. आशाताई आता आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुरावटींच्या रूपाने त्या आपल्या साऱ्यांच्या काळजात सदैव अमर असतील. अमर सुरांच्या या सम्राज्ञीला आदरांजली.
आशा मंगेशकरांची आशा भोसले झाली कोवळ्या वयात. लहानग्या वयापासून घरातली सगळी कामे आणि पुढे मुलांची जबाबदारी. तरुण वयात जोडीदार सोडून गेला. एकीकडे घर आणि मुलांचा सांभाळ आणि दुसरीकडे जमेल तशी गायकी. स्वातंत्र्योत्तर काळाचे दशक उलटता-उलटता लतादीदी ख्यातकीर्त झालेल्या होत्या. गीता दत्त आणि शमशाद बेगम यांच्यासारख्या गायिकांचे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य होते. हिंदी चित्रसृष्टीला बहर आला होता. आशा भोसले धडपडत होत्या. त्या गात होत्या, काही हिंदी-मराठी गाणी रेकॉर्ड पण झाली होती, त्यांच्या गाण्याला मान्यता मात्र मिळाली नव्हती. 1957 मध्ये दिलीपकुमार आणि वैजयंतीमालाचा ‘नया दौर’ हा चित्रपट आला. साहिर लुधियानवीने लिहिलेल्या आणि ओ. पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी आशा भोसले हे नाव प्रकाशात आले. तत्पूर्वी सचिन देव बर्मन यांच्यासोबत त्या गायिल्या होत्या. त्यांचे चित्रपट चालले होते. पण आशा भोसले यांचे दमदार गायिका असे नाव झाले नव्हते. यश त्यांना हुलकावण्या देत होते. आशाताईंच्या जीवनात ‘नया दौर’च्या निमित्ताने खरोखर नवे युग सुरू झाले. तेव्हापासून आशाताईंचे गाणे जे नव्या दमाने सुरू झाले, ते अखेरपर्यंत थांबले नाही. आशाताईंचा खरा प्रवास सुरू झाला तेव्हा लतादीदी प्रस्थापित झाल्या होत्या. घर आणि घराणे एकच. महावृक्षाच्या सावलीत स्वतःच्या गायकीच्या वृक्षाला बहर आणायचा हे आव्हानच होते. ते त्यांनी स्वीकारले. संकटे, संघर्ष, दगदग यांचे सावट कलेवर आणि साधनेवर पडू दिले नाही. त्या सतत गात राहिल्या. प्रयोग करीत राहिल्या. त्यांनी तब्बल बारा हजारावर गाणी गायिली. प्रामुख्याने ती हिंदी आणि मराठीतच असली तरी देशातल्या आणि जगातल्या एकूण 20 भाषांमध्ये त्या गायिल्या. बंगाली, गुजराती, आसामी, भोजपुरी, पंजाबी, तमिळ, मल्याळम, तेलगू, नेपाळी आणि इंग्रजीतही त्या गायिल्या.
आर. डी. बर्मन यांच्याशी आशाताईंचे दुसरे लग्न झाले होते. आर. डी. उपाख्य पंचमदा आणि आशाताईंनी सिनेसृष्टीला अवीट गोडीची आणि विविध धाटणीची अनेक गाणी दिली. या जोडीने चित्रसृष्टीच्या संगीताचा चेहरामोहराच बदलून टाकला. काही वर्षांपूर्वी आशाताईंची एक मुलाखत झाली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या की, पंचमना (आर. डी. बर्मन) भेटेपर्यंत आपण इतक्या ताकदीने आणि विविधतेने गाऊ शकतो, याची मला कल्पनाच नव्हती. ओ. पी. नय्यर यांनी प्रस्थापित केलेल्या आशाताईंना एका धाटणीत न अडकवता वैविध्यात रमविले ते आर. डी. बर्मन यांनी. पुढे 1981 मध्ये आलेल्या ‘उमराव जान’मध्ये रेखा जितकी गाजली, तितकीच गाजली आशा भोसलेंची गायकी. शहरयार यांनी लिहिलेली गाणी, खय्यामचे संगीत आणि आशाताईंचा सूर यातून दिल चीज क्या है, इन आँखों की मस्ति के, जुत्सजू जिसकी थी अशा एकाहून एक सरस चीजा चित्रपट संगीताला मिळाल्या. आशाताईंच्या स्वरांत गाण्यातील भावनेच्या गरजेप्रमाणे खट्याळपणा असे आणि आर्तताही. गंमतही असे आणि गांभीर्यही. ‘उडे जब जब जूल्फें तेरी’ ते ‘चैन से हमको कभी’ ही त्यांची एकमेव ‘रेंज नव्हे’. अशा कितीतरी ‘रेंजेस’ त्यांच्या हजारो गीतांतून काढता येतील. बंधू हृदयनाथ मंगेशकर, कवी सुरेश भट, सुधीर फडके, शांताराम नांदगावकर, जगदीश खेबुडकर, शांता शेळके, राजा बढे, सी. रामचंद्र अशी कित्येक नावे आहेत, ज्यांच्या साथीने आशाताईंच्या मराठी संगीतातील योगदानाचा उल्लेख करावा लागतो. ही सारी अत्यंत प्रतिभावंत मंडळी. गीतकाराच्या शब्दांना आवाज देणे किंवा चालीवर गाणे एवढेच गायकाचे काम नसते. शब्दांमागील भाव गायकाला व्यक्त करावा लागतो. सुरात गातानाही शब्दांना न्याय देण्याचे भान गायकाला ठेवावे लागते. आशाताईंनी या प्रतिभावंतांच्या आव्हानांना संधी मानले आणि त्यामुळेच त्या अष्टपैलू गायिका म्हणून प्रसिद्ध झाल्या. संगीत आणि गायकीला जीवन अर्पण केलेली ही गायिका.asha bhosle तिने कधीही कोणत्याही अपमार्गाचा अवलंब करून स्वतःला सिद्ध केले नाही आणि खरोखर काहीतरी नवे सिद्ध करण्याचा प्रसंग आला तेव्हा कोणत्याही आव्हानापासून पळ काढला नाही. त्यामुळेच आशाताईंचा स्वर अनेकदा इतक्या वैविध्याने व्यक्त होतो की, अनेकदा आपल्या कानांवर पडत असलेले ‘हे’ गाणे नेमके कुणी गायिले, याचा अंदाज येत नाही. आशाताईंच्या स्वरांची ओळख वेगळी आणि त्यांच्या लकबीची नजाकत वेगळी. एरवी साधे बोलत असतानाच आशाताईंचा खरा आवाज कानांवर पडायचा. गाण्यांतून त्यांच्या लकबी आणि ताना ओळखीच्या झाल्या. कोणत्या शब्दावर भर द्यायचा आणि कुठल्या शब्दांना गाण्यात वाहून जाऊ द्यायचे, याचे कौशल्य आशाताईंच्या अनेक गाण्यांतून दिसायचे. आता गीतकाराचे शब्द अजरामर करणारीच नव्हे तर लौकिकार्थाने काव्य किंवा नादमय नसलेल्या गाण्यातही जीव ओतणारी गायिका आपल्यात नाही. ‘एक सौ सोलह चांद की रातें, एक तुम्हारे कांधे का तिल, गीली मेंहदी की खुशबू, झुठमूठ के शिकवे कुछझूठमूठ के वादे भी सब याद करा दूँसब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो’, हे गाणे गुलजार साहेबांनी लिहिले होते. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इजाजत’ या चित्रपटातले हे गीत. या गाण्यासाठी गुलजार यांना सर्वोत्कृष्ट गीतकार आणि आशा भोसले यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला होता. पण, मुळात हे गाणेच नव्हते. ते मुक्तंद पद्धतीने लिहिलेले काव्य होते. असे म्हणतात की, गुलजार यांनी हे गाणे आर. डी. बर्मन यांना दाखवले तेव्हा त्यांनी गुलजार साहेबांची गंमत केली होती. आता पेपरातल्या बातमीला संगीत द्यायचे तेवढे राहिले, असे पंचमदा गुलजार यांना म्हणाले होते. कारण या गाण्याचे शब्द गद्यासारखे वाटत होते. त्या गद्याला आशाताईंनी पद्यात उतरवून दाखविले. हजारो गाणी गायिली असली तरी आशाताईंकडे देण्यासारखे खूप काही होते याचा हा पुरावा. आजही ते गाणे कुठे तरी वाजत असते तेव्हा आपसूकच मनात येते की, आशाताई, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं...