आशाताईंच्या स्वप्नाला सुरांचे पंख!

संगीत अकादमीला मंत्रिमंडळाची मंजुरी

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Cabinet approves music academy मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या स्मृतींना उजाळा देणारी संगीत अकादमी उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या दीर्घकाळ व्यक्त झालेल्या इच्छेला पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या वतीने मुंबईत जागतिक दर्जाची संगीत अकादमी स्थापन करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मान्य करण्यात आला. वांद्रे ते अंधेरी या दरम्यान या अकादमीसाठी योग्य शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. या जागेचा शोध घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली आहे.

असवेवर  
 
आशा भोसले यांनी त्यांच्या आयुष्यात मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकादमी उभारावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. ही अकादमी वांद्रे आणि अंधेरी परिसरातच उभारावी, अशी त्यांची इच्छा होती. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली.मंत्र्यांच्या चर्चेदरम्यान आशा भोसले यांच्या स्मरणार्थ पारंपरिक स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या कल्पनेतील संगीत अकादमी प्रत्यक्षात आणणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री यांनीही या भूमिकेला पाठिंबा देत हा प्रकल्प पुढे नेण्याचे आदेश दिले. या अकादमीमुळे संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना प्रशिक्षणाची उत्तम सुविधा मिळणार असून राज्यातील सांस्कृतिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी ही संस्था उभारण्यात येणार असून भविष्यात ती संगीत शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.