शाळकरी वाहनात विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड,
school vehicles शहरातील विविध परिसरात विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक होत असल्याचे समोर आलेले चित्र अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. कारंजा शहरात शहरासह ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांची वाहनाने ने आण केल्या जाते.परंतु शिक्षणासाठी घराबाहेर पडणार्‍या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी समाजाची आणि प्रशासनाची असताना, त्याच विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाहनांमध्ये कोंबून नेले जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. शहरातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, वाहनचालक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत.
 
 
school vehicles
 
 
झाशी राणी चौकासारख्या गर्दीच्या भागात रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे. परिणामी, नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांची स्थिती अधिक चिंताजनक आहे. लहानग्या विद्यार्थ्यांना एका वाहनात क्षमतेपेक्षा अनेकपटीने भरून नेले जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. अशा प्रकारे कोंबून वाहतूक करणे म्हणजे अपघाताला खुले आमंत्रण देण्यासारखेच आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. याहून गंभीर बाब म्हणजे या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच वाहतूक पोलीस प्रशासन यांची भूमिका अत्यंत निष्क्रिय दिसून येत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी निश्चित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे, तसेच शाळांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. या निमित्ताने अपघात झाल्यावरच जाग येणार का? असा प्रश्न आता प्रत्येक पालक आणि नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने झोपेतून जागे होऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय ही व्यवस्था सुधारणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
..............