इस्लामाबाद,
Iran's foreign minister accuses America इस्लामाबाद येथे झालेल्या इराण आणि अमेरिका यांच्यातील उच्चस्तरीय चर्चेला अखेर अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र हा करार अगदी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला होता, अशी माहिती इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघचीयांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले की दोन्ही देशांमधील समझोता केवळ थोड्याच अंतरावर असताना शेवटच्या क्षणी अमेरिकेच्या भूमिकेमुळे वाटाघाटी अयशस्वी ठरल्या. अराघची यांनी सांगितले की युद्ध थांबवण्यासाठी इराणने प्रामाणिकपणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चेत सहभाग घेतला होता. मात्र, अमेरिकेकडून सतत बदलणाऱ्या अटी, अवाजवी अपेक्षा आणि विविध अडथळ्यांमुळे करार होऊ शकला नाही. जवळपास पाच दशकांनंतर इतक्या उच्च स्तरावर झालेला हा संवाद महत्त्वाचा मानला जात असतानाही तो निष्फळ ठरल्याने निराशा व्यक्त करण्यात येत आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना त्यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात नमूद केले की, ४७ वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये इतक्या तीव्र आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या, पण शेवटच्या टप्प्यावर निर्माण झालेल्या अडचणींमुळे सर्व प्रयत्न अपूर्ण राहिले. सद्भावनेने केलेल्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मसूद पेझेश्कियान यांनीही कराराची शक्यता पूर्णपणे नाकारलेली नसून, अमेरिकेने आपली भूमिका बदलून इराणच्या अधिकारांचा सन्मान केल्यास तो मार्ग खुला होऊ शकतो, असे संकेत दिले. त्यांनी वाटाघाटी करणाऱ्या प्रतिनिधीमंडळाचे कौतुक करत पुढील चर्चांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली.