नवी दिल्ली
ISI spy भारतातील संवेदनशील लष्करी ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हेरगिरीचे जाळे उभे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सौरऊर्जेवर चालणारे आणि सिम कार्डद्वारे थेट फुटेज पाठवणारे सीसीटीव्ही कॅमेरे भारतातील विविध ठिकाणी बसवून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई करत पंजाब आणि दिल्ली येथून ११ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील एका ‘डीप एसेट’कडून भारताला याबाबत आधीच सतर्क करण्यात आले होते. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. या तपासादरम्यान सौरऊर्जेवर चालणारे आणि सिम-सक्षम असे एकूण ९ सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करण्यात आले. हे कॅमेरे अशा ठिकाणी बसवण्यात आले होते, जिथून भारतीय लष्कर, बीएसएफ तसेच इतर सुरक्षादलांच्या हालचालींवर नजर ठेवणे शक्य होते.तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या कॅमेऱ्यांमधून मिळणारे थेट फुटेज पाकिस्तानमधील आयएसआयपर्यंत पोहोचत होते. पंजाबमधील कपूरथला, जालंधर, पटियाला आणि मोगा या भागांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकली असती.
छापेमारीदरम्यान ISI spy पोलिसांनी शस्त्रसाठाही जप्त केला असून, चार पिस्तुलांसह २४ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांचा पाकिस्तानातील काही घटकांशी थेट संपर्क असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या माध्यमातून नियोजनबद्ध हेरगिरीचे मॉडेल उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.या प्रकरणाचा धागा सर्वप्रथम गाझियाबाद पोलिसांच्या कारवाईतून सापडला होता. त्यानंतर दिल्ली आणि पंजाबमध्ये समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत आयएसआयचे भारतातील सक्रिय नेटवर्क उघडकीस आले असून, आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे देशाच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या आणि दूरस्थपणे नियंत्रित होणाऱ्या उपकरणांचा वापर करून हेरगिरी करण्याचा हा नवा प्रकार असल्याने सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही महत्त्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.