पाटणा,
Lalu Prasad Yadav's petition dismissed बिहारमधील चर्चित 'नोकरीच्या बदल्यात जमीन' प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या निर्णयानंतरही न्यायालयाने काही प्रमाणात दिलासा देत सुनावणीदरम्यान लालू प्रसाद यादव यांना वैयक्तिकरीत्या न्यायालयात हजर राहण्याची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानेही केंद्रीय तपास यंत्रणेकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता. तपास यंत्रणेची कारवाई अवैध असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला होता.हे प्रकरण लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना झालेल्या नियुक्त्यांशी संबंधित आहे. आरोपानुसार, काही गट ड पदांवरील नियुक्त्या करण्यात आल्या आणि त्या बदल्यात संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या जवळच्या लोकांकडून जमीन हस्तांतरित करण्यात आली असल्याचे म्हटले जाते. या प्रकरणात तपास यंत्रणेने गंभीर आरोप करत अनेक पुरावे सादर केले आहेत. विशेष न्यायालयाने यापूर्वीच अनेक आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे लालू प्रसाद यादव यांच्यावरचा कायदेशीर दबाव कायम असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.