कारंजा लाड,
exposed power lines तालुक्यातील कामरगाव विद्युत सहाय्यक अभियंता कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळगाव बु. येथे विद्युत व्यवस्थेचा गंभीर बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शेतकरी विद्युत वाहिनीवर आवश्यक असलेला फ्युज नसल्यामुळे केबल थेट मुख्य वीजवाहिनीस जोडण्यात आल्याने नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील विद्युत खांबांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले फ्युज बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी, संबंधित केबल थेट मुख्य तारांशी जोडण्यात आली असून, ही जोडणी पूर्णपणे असुरक्षित आहे. यामुळे वारंवार शॉर्टसर्किट होऊन ठिकठिकाणी ठिणग्या उडत असल्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकार काही दिवसांपासून सुरू असूनही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.या धोकादायक परिस्थितीमुळे पिंपळगाव बु. येथील शेतकरी व नागरिक अक्षरशः भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. ही वीजवाहिनी घरांच्या अगदी जवळून जात असल्याने कधीही मोठी आग लागून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे आज नाही तर उद्या मोठा अपघात होणारच अशी भावना ग्रामस्थांमध्ये तीव्र झाली आहे.या संदर्भात अनेक वेळा संबंधित विद्युत अभियंत्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारे जीव धोयात घालणार्या या व्यवस्थेविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत तात्काळ फ्युज बसवून सुरक्षित विद्युत व्यवस्था उभी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, उद्भवणार्या कोणत्याही दुर्घटनेला संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून या गंभीर समस्येचे निराकरण करणे अत्यावश्यक ठरत आहे.