‘मोनालिसा’ फरार... कुटुंबीयांचे गंभीर आरोप

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
अजमेर/महेश्वर
Monalisa प्रयागराज महाकुंभ २०२५ दरम्यान चर्चेत आलेल्या मोनालिसा प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून, तिचा पती असल्याचा दावा करणाऱ्या फरमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये फरमानने असा दावा केला आहे की, लग्नानंतर मोनालिसा अचानक त्याला सोडून पळून गेली असून तो तिचा शोध घेत अजमेरपर्यंत गेला, मात्र ती तेथे सापडली नाही. आता तो जोधपूरकडे रवाना झाल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच, कोणाकडेही मोनालिसाबाबत माहिती असल्यास ती कळवावी, असे आवाहनही त्याने केले आहे.मोनालिसाच्या मूळ गावी महेश्वर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध चर्चांना उधाण आले आहे.
 

Monalisa missing case India, 
या प्रकरणात मोनालिसाच्या कुटुंबीयांनी मात्र फरमानचे सर्व दावे फेटाळून लावत गंभीर आरोप केले आहेत. मोनालिसाच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिची मुलगी स्वतःहून पळून गेलेली नसून तिला फरमाननेच गायब केले आहे. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, गेल्या काही महिन्यांपासून त्यांना मुलीशी संपर्क साधता आलेला नाही. सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी फरमानने अल्प वेळासाठी फोनवर बोलणे करवले होते, मात्र त्यानंतर तिचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
मोनालिसाच्या आईने आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, फोनवर बोलताना फरमानने मुलीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला होता. यावरून ती मुलगी त्याच्या ताब्यात बंधकासारखी ठेवण्यात आली असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीती आणि संताप निर्माण झाला असून, आईची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. वडीलही धक्क्यात असून बोलण्याच्या स्थितीत नाहीत.
दरम्यान, या प्रकरणाला अधिक गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या हस्तक्षेपानंतर मोनालिसाची खरी जन्मतारीख समोर आली. तपासात ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारच्या निर्देशानुसार महेश्वर पोलिस ठाण्यात फरमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, कायदेशीर कारवाई वेगाने पुढे नेली जात आहे.