वाशीम,
mrunmayee solanke वडील शेतकरी कुटुंबातून आलेले. कुठलेही मार्गदर्शन नसताना, त्यांनी नागठाणा (ता. वाशीम) या छोट्या गावातून स्पर्धा परीक्षेला गवसणी घातली. आज ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (एसीईओ) आहेत. वडिलांच्या या कष्टाचा वारसा मुलीने जपला. जिद्द, चिकाटीच्या बळावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील फ्युचर वुई वॉन्ट मॉडेल युनायटेड नेशन्स परिषदेसाठी तिची निवड झाली.
हा प्रेरणादायी प्रवास आहे तो मृण्मयी वासुदेव सोळंके हिचा. मृण्मयीचे वडील वासुदेव हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. वडिलांनी जपलेली मातीची अस्मिता मृण्मयीही जपत आहे. याच मातीचा कष्टगंध सातासमुद्रापार दरवळणार आहे. ही परिषद महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. भविष्यातील नेते घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. यात विद्यार्थी एकत्र येऊन मुत्सद्देगिरीचे प्रशिक्षण घेतात तसेच जागतिक समस्यांवर चर्चा करून उपाययोजना सुचवतात.
दरवर्षी वेगवेगळ्या देशांत ती होते. पण, बहुतांश वेळा ती न्यूयॉर्कमध्येच झाली. शाश्वत विकास उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून तरुणांना नेतृत्व आणि जागतिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी यातून दिली जाते. तिला यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. प्रवास, निवास आणि सहभागाचा संपूर्ण खर्च आयोजकांकडून केला जाणार आहे. तिने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिली. महिला आणि मुलींवरील हिंसाचाराचे निर्मूलन आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न यांसारख्या संवेदनशील विषयांवर तीने भारताची भूमिका मांडली आहे.