महावितरणचे सुरक्षा ’कवच’

विविध कार्यक्रमांसाठी महावितरणने कसली कंबर

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
नागपूर,
MSEDCL भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी नागपूर शहरात निघणार्‍या भव्य मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांसाठी महावितरणने कंबर कसली आहे. दीक्षाभूमी, संविधान चौक, डॉ. आंबेडकर चौक, इंदोरा, रामेश्वरी, मेडीकल भगवान नगर आणि जयभीमनगर यांसारख्या प्रमुख केंद्रावर अनुयायांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, अखंडित वीजपुरवठा आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महावितरणने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या भागातील देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून, संपूर्ण उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
 

MSEDCL 
सर्व्हिस वायर्सची उंची सुरक्षित स्तरावर
 
 
अधिकार्‍यांनी मिरवणूक मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अडथळे दूर केले आहेत. उंच चित्ररथांना अडथळा ठरू शकणार्‍या लोंबकळणार्‍या वीज तारा आणि सर्व्हिस वायर्सची उंची सुरक्षित स्तरावर वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी उघड्या तारा बदलून त्या जागी अत्याधुनिक इन्सुलेटेड केबल्स टाकण्यात आल्या आहेत. उत्सवाच्या काळात कोणतीही तांत्रिक अडचण नये, यासाठी मुख्य ठिकाणांवर कर्मचार्‍यांची विशेष पथके तैनात राहतील, असे प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
 
 
अनधिकृतपणे वीज घेणे टाळावे
 
 
सुरक्षिततेचे भान, हेच खरे अभिवादन: तांत्रिक सज्जतेसोबतच महावितरणने सामाजिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मिरवणूक, डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात कोणताही अपघात घडू नये, यासाठी आयोजकांना काही महत्त्वाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आहे. स्वागत कक्ष किंवा रोषणाईसाठी वीज खांबावरून अनधिकृतपणे वीज घेणे टाळावे, तसेच पिण्याच्या स्टॉल्स विद्युत डीपी किंवा खांबांपासून सुरक्षित अंतरावर ठेवावेत. चित्ररथांवरील ध्वज किंवा सजावट करताना वरून जाणार्‍या उच्च दाबाच्या तारांचा अंदाज घेऊनच हालचाली कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 
विजेची ठिणगी दिसल्यास कळवा
 
मिरवणूक सुरू करण्यापूर्वी आयोजकांनी ठरवलेल्या विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि ओपन जंक्शन बॉक्सची माहिती आधीच घ्यावी. शक्य असल्यास उंचीच्या वाहनांचा वापर करावा आणि जनरेटर ट्रॉली सुरक्षित अंतरावर ठेवावी. मिरवणुकीच्या पुढे जाणारे स्वयंसेवक नेमून त्यांना धोक्याची सूचना देणारी साधने द्यावीत. कुठेही तुटलेल्या वायर्स किंवा विजेची ठिणगी दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवून नागरिकांनी त्या जागेपासून सुरक्षित अंतर ठेवावे.