मुंबई
housing project मुंबईत स्वतःचे घर असणे हे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वप्न असते. वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकदा दूरचे वाटत असले तरी आता या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत बोरिवली पश्चिम येथे भव्य स्मार्ट टाऊनशिप विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, हा प्रकल्प मुंबई महानगरातील आतापर्यंतचा सर्वात मोठा परवडणाऱ्या घरांचा उपक्रम ठरणार आहे.
या प्रकल्पासाठी बोरिवलीतील गोराई आणि शिंपोली परिसरातील सुमारे २८.८४ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. या जमिनींपैकी गोराई येथील भूखंड भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या मालकीचा असून शिंपोली येथील जमीन महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) अंतर्गत येते. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये झालेल्या समन्वयानंतर ही जमीन महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला गती देत संबंधित जमीन हस्तांतरणास मंजुरी दिली असून या प्रकल्पासाठी सुमारे ७२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महा-हाऊसिंग विभागाच्या माहितीनुसार, हा प्रकल्प राज्यातील महानगरांमधील सर्वात मोठा परवडणाऱ्या घरांचा उपक्रम ठरण्याची शक्यता आहे.प्रस्तावित टाऊनशिपमध्ये सुमारे ४५० चौरस फुटांची घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ही टाऊनशिप केवळ निवासी प्रकल्प नसून आधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘स्मार्ट लिव्हिंग झोन’ म्हणून विकसित केली जाणार आहे. येथे शिक्षण संस्था, अत्याधुनिक रुग्णालये, क्रीडांगणे, कौशल्य विकास केंद्रे तसेच सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
भौगोलिकदृष्ट्या हा housing project प्रकल्प अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी उभारला जाणार आहे. मेट्रो स्थानकांच्या जवळ असल्यामुळे तसेच प्रस्तावित वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडशी जोडणी असल्याने येथील रहिवाशांना दक्षिण मुंबई आणि अंधेरीसारख्या प्रमुख व्यवसायिक केंद्रांपर्यंत जलद पोहोच शकणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च दोन्हीमध्ये मोठी बचत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महा-हाऊसिंगचे व्यवस्थापकीय संचालक त्रिंबक कासार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया वेगाने सुरू असून भूमिपूजन येत्या दोन ते तीन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन ते चार वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करून घरांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या प्रकल्पामुळे बोरिवली परिसरात परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढण्याबरोबरच स्थानिक स्थावर मालमत्ता बाजारपेठेवरही सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी हा प्रकल्प आशेचा नवा किरण ठरू शकतो.