कारंजात अल्पवयीन भिकार्‍यांची वाढ चिंताजनक

महिला व बालविकास विभागाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड,
beggars in karanja शहरात अल्पवयीन मुलांकडून भीक मागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढ झाली असून, ही बाब अत्यंत चिंताजनक ठरत आहे. विशेष म्हणजे, यांचे पालकच यांचेकडून भीक मागून घेतात.शिवाय या मुलांपैकी अनेक मुले नशेच्या विळख्यात अडकत असल्याचे समोर येत आहे. सोल्यूशन (गोंद/रासायनिक द्रव्य) सूंघून नशा करण्याची प्रवृत्ती वाढत असून, यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
 
 
 
भिकारी
 
बसस्थानक, बाजारपेठ तसेच चौका चौकात अल्पवयीन मुले भीक मागताना सहज दिसून येतात. काही मुले दिवसभर रस्त्यावरच वावरत असून, शिक्षणापासून पूर्णपणे दुरावलेली आहेत. नागरिकांकडून मिळणार्‍या पैशातून ही मुले अन्नाऐवजी नशेसाठी सोल्यूशन खरेदी करत असल्याचेही समोर आले आहे. सोल्यूशन सूंघल्यामुळे मेंदूवर थेट परिणाम होतो. या मुलांमध्ये चिडचिड, आक्रमक वर्तन, आरोग्य बिघाड आणि गुन्हेगारीकडे झुकण्याची शयता वाढत आहे. लहान वयातच या प्रकारच्या व्यसनामुळे त्यांच्या भवितव्यावर काळी छाया पडत आहे.या गंभीर समस्येकडे जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची टीका होत आहे.
 
बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या यंत्रणांनी वेळोवेळी शोधमोहीम राबवून अशा मुलांची ओळख पटवणे, त्यांचे पुनर्वसन करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.समुपदेशन व पुनर्वसनाची गरजतज्ज्ञांच्या मते, या मुलांना केवळ भीक मागण्यापासून थांबवणे पुरेसे नाही, तर त्यांना योग्य समुपदेशन, व्यसनमुक्ती उपचार आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी समाजकल्याण, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.
शोधमोहीम राबविण्याची मागणी
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने विशेष शोधमोहीम राबविण्याची मागणी केली आहे. या मोहिमेद्वारे शहरातील सर्व अल्पवयीन भिकार्‍यांची नोंद घेऊन त्यांना सुरक्षित निवारा, अन्न, शिक्षण व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.beggars in karanja कारंजा शहरातील ही समस्या केवळ सामाजिक नाही, तर मानवी दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर आहे. वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर ही मुले गुन्हेगारी व व्यसनाच्या अंधारात हरवण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना राबवून या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे.