नागपूर,
sangh headquarters 14 ऑक्टाेबर 2024. नागपूरच्या हृद्य आठवणी सांगितल्या जातील तेव्हा या दिवसाला विशेष महत्त्व असेल. या दिवशी दैवी स्वर लाभलेल्या आशाताई भाेसले महालातील संघ मुख्यालयात सरसंघचालक डाॅ. माेहनजी भागवत यांना खास भेटायला आल्या हाेत्या. गप्पांसाेबतच सुरू झालेला हा प्रवास पुढे संगीत मैफलीत परिवर्तित झाला आणि संघ मुख्यालयात तासभर आशाताईंचे दैवी स्वर निनादत राहिले.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भाेसले यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांची सरसंघचालकांसाेबतची नागपूर येथील भेट आणि दुसऱ्या भेटीत मुंबई येथील आशाताईंच्या घरी सरसंघचालकांनी केलेले भाेजन या दाेन्ही प्रसंगांचे साक्षीदार असलेले आणि या भेटीचे समन्वयक असलेले नागपूरचे प्रसिद्ध गायक अमर कुळकर्णी यांनी हा संपूर्ण वृत्तांत तरुण भारतशी बाेलताना कथन केला.
भारतातील विविध मान्यवरांनी आशाताईंवर लिहिलेल्या 91 लेखांचा समावेश असलेल्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या ग्रंथाचे प्रकाशन 28 जून 2024 राेजी मुंबईतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात सरसंघचालक डाॅ. माेहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले हाेते. सरसंघचालक डाॅ. माेहनजी भागवत हे माझ्या देवघरातील व्यक्तिमत्त्व असल्याचे मत यावेळी मनाेगतात आशाताईंनी व्यक्त केले हाेते. नागपूरच्या संघ मुख्यालयात येण्याचे आणि रेशीमबागची पवित्र भूमी बघण्याचे निमंत्रण सरसंघचालकांनी त्यांना दिले हाेते. आशाताईंनी निमंत्रण स्वीकारले. डाॅ. माेहनजींकडून संघ जाणून घेण्याची त्यांची मनाेमन इच्छा हाेती आणि हीच ओढ त्यांना संघ मुख्यालयात घेऊन आली. या भेटीची जबाबदारी अमर कुळकर्णी यांच्यावर साेपविण्यात आली हाेती. ते सांगतात, डाॅ. माेहनजींनी निमंत्रण दिल्यानंतर 15 दिवसांत आशाताईंचे मला अनेकदा फोन आले आणि तारीख पक्की करण्याचा आग्रह त्यांनी धरला आणि 14 ऑक्टाेबर 2024 राेजी त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली.
माझ्यामुळे वेळ हाेता कामा नये
आशाताई नागपूरला आल्या तेव्हा त्या 91 वर्षांच्या हाेत्या. त्यांना सकाळी 10.30 ही भेटीची वेळ देण्यात आली हाेती. वेळेच्या 15 मिनिटांपूर्वी पाेहाेचण्यासाठी त्यांची लगबग सुरू हाेती. ही कामाची माणसे आहेत. आपल्यामुळे त्यांचा वेळ वाया जायला नकाे, असे त्या म्हणाल्या हाेत्या आणि वेळेपूर्वीच संघ मुख्यालयात पाेहाेचल्या.
माझ्या मनातली गाणी आज ऐकविणार
अमर कुळकर्णी सांगतात, या भेटीत राजकारण, समाजकारण, धर्म, अध्यात्म यासह अनेक विषयांवर प्रश्न विचारून आशाताईंनी माेहनजींकडून उत्तरे जाणून घेतली. यावेळी त्यांना काहीतरी ऐकवा असे म्हटले असता, क्षणाचाही विलंब न करता त्या म्हणाल्या, आज मी माझ्या मनातली गाणी ऐकविणार आणि ही सुरेल मैफल तासभर रंगली.
संघगीत गायचे राहूनच गेले...
रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षात संघगीतांचे ध्वनिमुद्रण सुरू असताना आशाताईंनीदेखील एक गीत गावे अशी इच्छा सरसंघचालकांनी बाेलून दाखविली हाेती. यावर त्यांनी तत्काळ हाेकार दिला हाेता. ‘ध्येय साधना अमर रहे’ हे गीत त्या गाणार हाेत्या. अमेरिकेतून आल्यावर गेल्या वर्षी हे गाणे त्या रेकाॅर्ड करणार हाेत्या.sangh headquarters परंतु यादरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि नंतर त्या गाऊच शकल्या नाहीत. यशराज स्टुडिओमध्ये विजू दया यांच्याशी बाेलून, आवाज बरा हाेताच हे गीत मी गाणार असे त्यांनी सांगितले हाेते. पण त्यांची ही इच्छा राहूनच गेली. ही आठवणही अमर कुळकर्णी यांनी तभाला सांगितली.