थकलेल्या काँग्रेसला ‘सृजन’ नवसंजीवनी देणार का?

-दिग्गजांच्या सोडचिठ्ठीने जिल्हा काँग्रेसची वाताहत -गटबाजीमुळे जिल्हाध्यक्ष निवडीचे निरीक्षकांपुढे आव्हान

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
संदीप नंदनवार
नागपूर,
congress सुमारे ६० वर्षे देशावर अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाची गेल्या पंधरा वर्षात मोठी पिछेहाट झाली. नागपूर जिल्हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र या किल्ल्याचे अनेक बुरुज ढासळून गेल्याने जिल्हा काँग्रेस खिळखिळी झाली. काँग्रेस पक्षाने अनेक आघात झेलले. अनेक जण स्वार्थ साधत दुसऱ्या पक्षात गेले. मागील दोन-तीन वर्षांत जिल्हा काँग्रेसला मोठी गळती लागली आणि अनेक दिग्गजांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाली. या पृष्ठभूमीवर, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये संघटन सृजन अभियानांतर्गत अध्यक्ष बदलाचे वारे वात असून, नवीन जिल्हाध्यक्ष तरी थकलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 
 
थकलेल्या काँग्रेसला ‘सृजन’ नवसंजीवनी देणार का?
 
 
नागपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या सद्यस्थितीला आणि अधोगतीला अनेक राजकीय व संघटनात्मक कारणे कारणीभूत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सध्या जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था 'तोळा-मासा' आहे, तर काही तालुक्यात काँग्रेस पूर्णपणे थकलेल्या अवस्थेत आहे. जिल्हा काँग्रेसची धुरा नवीन जिल्हाध्यक्षाच्या हाती येणार असल्याची चर्चा असून सहा- सात जणांची नावे आघाडीवर आहेत. अशातच जिल्ह्याची धुरा 'लाडक्या बहिणी'च्या हातात दिली तर पुन्हा एकदा काँग्रेस चांगल्या अवस्थेत येणार असल्याचा दावा ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
पंजाची जादू पुन्हा दिसणार का ?
नागपूर जिल्हा हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. सुमारे ५० ते ६० वर्षे काँग्रेस आणि हाताचा पंजा याचीच जादू चालत होती. मात्र गेल्या काही वर्षात काँग्रेसची अपरिमित हानी झाली. आता काँग्रेस पक्षाने पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. संघटन सृजन अभियान अंतर्गत काँग्रेसचे मजबुतीकरण सुरु आहे. जिल्हा व तालुकास्तरावर याबाबत नियोजन करण्यात येत आहे. यासाठी शनिवार,११ एप्रिलला नागपुरात एआयसीसी निरीक्षक राव दानसिंग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नागपूर ग्रामीणचे सहनिरीक्षक खा.कल्याण काळे, वजाहत मिर्जा, शिवा राव ही मंडळी पोहोचली. १५ एप्रिलपर्यंत नागपूर जिल्हा ग्रामीण दौऱ्यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीला वेग येणार आहे.
अध्यक्ष निवड नवा आरंभ ठरेल काय?
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसला आपला पाया ग्रामीण भागात अधिक मजबूत करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. दिल्लीतील आक्रमक भाषणांवर गल्लीतले राजकारण चालत नसते, हे लक्षात ठेवावे लागेल. गटबाजीचे ग्रहण सर्वच पक्षांना लागले आहे. त्यामुळे काँग्रेसला फायदा घेण्याची संधी आहे. विशेष म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाने 'नाकारलेले' काँग्रेसला 'लाभदायक' ठरण्याची शक्यता आहे.. त्यामुळे 'या' अशा सर्वांना सांभाळणाऱ्या व्यक्तीची निवड जिल्हाध्यक्ष म्हणून काँग्रेसला करावी लागणार आहे आणि ती निवड पक्षाच्या मजबुतीचा आरंभ ठरेल काय, हे आगामी काळात समजेल.
या पाच कारणामुळे काँग्रेसची पिछेहाट
१. गटबाजी आणि अंतर्गत कलह : नागपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नेत्यांचे स्वतःचे स्वतंत्र गट आहेत. विशेषतः ग्रामीण भागात सुनील केदार आणि इतर निष्ठावंत नेत्यांमधील अंतर्गत मतभेद पक्षाच्या मजबुतसाठी अडचणीचे आहेत.
 
२. तळागाळातील संपर्काचा अभाव : भाजपाची संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत आहे. त्या तुलनेत काँग्रेसचे 'बूथ स्तरावरील' व्यवस्थापन कमकुवत आहे.
 
३. नेतृत्वाची पोकळी: नागपूर ग्रामीणमधील वजनदार नेते सुनील केदार यांना बँक घोटाळा प्रकरणात झालेल्या शिक्षेमुळे आणि त्यानंतर त्यांच्या अपात्रतेमुळे ग्रामीण भागात सक्षम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे.
 
. भाजपाचे वाढते वर्चस्व : भाजपाने विकासकामांच्या जोरावर शहरात आणि जिल्ह्यात आपली पकड घट्ट केली आहे. काँग्रेसला या भाजपाच्या नेत्यांच्या प्रभावासमोर प्रभावी पर्याय उभा करता आलेला नाही.
 
५. भाकरी न फिरवणे : अनेक वर्षांपासून जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीमध्ये बदल न झाल्याने नवीन आणि तरुण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.congress आता निरीक्षकांच्या उपस्थितीत नवीन निवडीची प्रक्रिया राबवली जात आहे.
जिल्हाध्यक्ष पदासाठी ही नावे आहेत चर्चेत
राजेंद्र मुळक, सुरेश भोयर, कुंदा राऊत, बाबा आष्टणकर, गंगाधर रेवतकर, अनिल रॉय व अश्विन बैस