पुणे,
Yellow alert in Vidarbha राज्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना चांगलाच त्रास देत आहेत. अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून काही जिल्ह्यांमध्ये ते ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील परिस्थिती अधिक गंभीर असून या भागासाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस हवामान अधिक तापदायक राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, तसेच दुपारच्या वेळेत प्रवास टाळावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
अनेक ठिकाणी पारा ४० पार
राज्यात मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागांमध्ये सूर्याचा तडाखा वाढला आहे. काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अकोला जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला असून अनेक शहरांमध्ये पारा ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान पोहोचला आहे. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम शेतीवरही दिसू लागला आहे. नांदेड जिल्ह्यात केळी पिकांना मोठा फटका बसत असून उष्णतेमुळे बागा करपण्याच्या स्थितीत आहेत. पाण्याची पातळी घटल्याने पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.