अन्यथा रेल्वे रोको आंदोलन : आ. रहांगडाले यांचा इशारा

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
- काचेवानी रेल्वे फाटकावरील ओव्हरब्रिजसाठी ना-हरकतची मागणी

तिरोडा,
हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील तिरोडा-गोंदियादरम्यान Kachewani: Railway Gate काचेवानी येथील रेल्वे फाटक (एल सी. क्र. ५१८, कि.मी. १०२४/११-१३) येथे मंजूर असलेल्या ओव्हरब्रिजच्या कामासाठी रेल्वे विभागाने तत्काळ ना-हरकत द्यावे, अन्यथा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार विजय रहांगडाले यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी रेल्वे विभागाला अधिकृत पत्र पाठविले आहे.
 
 
Rahangale
 
सदर ओव्हरब्रिजला सुमारे तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही रेल्वे विभागाकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर यांच्याकडून कामाला सुरवात होऊ शकली नाही. परिणामी, परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ११ मार्च २०२५ रोजी आ. रहांगडाले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, तसेच रेल्वे विभागाचे तांत्रिक अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष बांधकामस्थळी भेट दिली होती. त्यावेळी तीन महिन्यांत काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच वरिष्ठांशी चर्चा करून पुलाच्या कामातील अडथळे दूर करण्यात येतील, असेही तांत्रिक अधिकार्‍यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
 
 
Kachewani: Railway Gate सदर मार्गावर सद्या तीनही रेल्वेलाइन कार्यरत असल्यामुळे प्रवासी व मालगाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. त्यामुळे काचेवानी रेल्वे फाटक वारंवार दीर्घकाळ बंद राहते. अनेकवेळा एक ते दीड तास फाटक बंद राहिल्याने सामान्य नागरिक, रुग्णवाहिका, शासकीय कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून लोकप्रतिनिधीं विरोधातही आक्रोश व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी व अधीक्षक अभियंत्यांनी यासंदर्भात रेल्वे विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला असला, तरी अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर, येत्या काही दिवसांत ओव्हरब्रिजच्या कामास मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी, अन्यथा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार विजय रहांगडाले यांनी दिला आहे.