दोन अपघातात ३ ठार, ५ जखमी
भंडारा:
accident जिल्हयासाठी १४ एप्रिलचा सोमवार हा ‘घात"वार ठरला. झालेल्या दोन वेगवेगळया अपघातांमध्ये ३ जण ठार झाले असून ५ गंभीररित्या जखमी झाले आहेत. पहिला अपघात अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पवनी भंडारा मार्गावरील कोंढा ते पालोरा गावाजवळ सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला.
पिंपळगाव निपाणी येथील धनंजय गजानन भानाकर, सचिन गडेकर व बोरगाव येथील राजेश चेपा गजभिये हे तिघे जण एम.एच.३१/बी.वाय/ ९९२३ क्रमांकाच्या मोटार सायकलने पवनीकडे जात होते. दरम्यान पालोरा गावाच्या चौकाजवळ मागेहून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दूचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात धनंजय भानारकर, वय ३८ व राजेश गजभिये, वय ४५ यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन नारायण गाडेकर गंभीर जखमी झाला. घटनेनंतर वाहन चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ग्रामीण रुग्णालय अड्याळ नेले व जखमीला उपचारासाठी दाखल केले. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
accident दूसरा अपघात नागपूरहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम बघून येत असलेल्या तरुणाच्या कारचा झाला. यात अड्याळ परिसरातील तिर्री येथील सोनू उर्फ चंद्रकांत डोंगरे या तरुणाचा मृत्यू झाला. भंडारा शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावरील बेला गावाजळ अनियंत्रीत कार झाडावर आदळून हा अपघात झाला. या अपघातात साजीद मुस्तफा पठाण, क्रिश भिवाजी जिभकाटे, अभिषेक दीपक बंसोड, आयुष भास्कर कावळे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे पाचही तरुण १३ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता तिर्री येथून नागपूरला कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. कार्यक्रम पाहून परत येत असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.