Achalpur and Parthwada: Sexual abuse अचलपूर व परतवाडा परिसरातल्या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत केल्या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी गटरमलपुरा येथील रहिवासी अयान अहमद तनविर अहमद (वय १९) याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली. आरोपीला न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Achalpur and Parthwada: Sexual abuse माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही मुलींचे तसेच एका इसमाचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी तत्काळ याची पडताळणी केली असता, आरोपी अयान याने विविध मुलींसोबतचे फोटो व व्हिडिओ चित्रीत करून ते जाणीवपूर्वक सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले.
प्राथमिक तपासात संबंधित मुली अल्पवयीन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीने मुलींशी जवळीक साधून त्यांच्या इच्छेविरुद्ध अश्लील फोटो व व्हिडिओ काढले आणि नंतर ते व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याचा घृणास्पद प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिस अमलदार निलेश काळे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या पास्कोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरोपी एमआयएमचा कार्यकर्ता
दरम्यान, आरोपी अयान हा एमआयएम पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समोर येत असून, त्याला पदाधिकार्यांकडून नियुक्ती पत्र देण्यात आल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. या पृष्ठभूमीवर प्रकरणाला अधिकच संवेदनशील वळण लागले आहे.
भीती बाळगू नका, पुढे या
अमरावती ग्रामीण पोलिसांनी पीडित मुली व त्यांच्या कुटुंबियांना स्पष्ट आवाहन केले आहे की, भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार नोंदवा. पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. समुपदेशन व कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारचे आक्षेपार्ह फोटो/व्हिडिओ शेअर किंवा फॉरवर्ड करू नयेत, असेही पोलिसांनी बजावले आहे. या प्रकरणात अन्य काही सहभागी असण्याची शक्यता असल्याने सखोल चौकशीची आमची मागणी असल्याचे आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी बोलणे झाल्याचेही त्यांनी नमुद केले.
जुळे शहर आज बंद
१५ एप्रील रोजी परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरात बंद पाळून घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येणार आहे. या संदर्भात हिंदूत्ववादी संघटना तसेच व्यापारी संघटना, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक वाघामाता मंदीर परिसरात आयोजीत करण्यात आली आहे.