नागपूर,
Akola is second hottest city in world गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती, मात्र आता त्या पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा एकदा उन्हाचा तीव्र कडाका वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळिशीच्या वर गेला असून नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. जागतिक तापमान नोंदवणाऱ्या संकेतस्थळाच्या अहवालानुसार, अकोला हे जगातील अत्यंत उष्ण शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर नोंदवले गेले आहे. एप्रिल महिन्यातच उष्णतेचा कहर सुरू झाल्याने पुढील मे महिन्याबाबतही नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भासह अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या दिवसांत तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आठ दिवस तीव्र उष्णतेचा धोका कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी तापमान चाळिशीपार नोंदवले जात आहे. अकोल्यात मागील दोन दिवसांपासून उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून, हे शहर देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. शनिवारी अकोल्यात तापमान ४३.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, तर रविवारी ते वाढून ४३.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या वाढत्या तापमानामुळे शहरात अंगाची लाहीलाही होत आहे.