अचलपूर सत्र न्यायालयाचा दिलासा
अचलपूर,
Bachchu Kadu: Anticipatory bail आ. प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाच्या जीविताला धोका निर्माण करण्याच्या संदर्भातील व्हायरल झालेल्या फोन कॉल रेकॉर्डिंगच्या आरोपप्रकरणी माजी मंत्री बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला असून कारस्थान प्रकरणी अचलपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सागर पाटील यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयामुळे बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी आ. प्रवीण तायडे व त्यांच्या चुलत भावाने ’ चांदूर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीसोबत त्यांनी एक ध्वनिफीत (ऑडिओ क्लिप) सादर केली होती. त्यामध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या दोन सहकार्यांचा आवाज असल्याचा दावा करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, कुरळपूर्णा येथील निवासस्थानी बसून प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांना अपघाताच्या स्वरूपात संपवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यासाठी यवतमाळ येथील एका टोळीची मदत घेण्याबाबत चर्चा झाल्याचा उल्लेखही करण्यात आला होता. या ध्वनिफितीमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
या आरोपांनंतर जिल्ह्याच्या राजकारणात वातावरण तापले होते. आ. प्रवीण तायडे यांनी पत्रकार परिषद घेऊन बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले होते, तर दुसरीकडे बच्चू कडूंनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हे आपल्या विरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचे स्पष्ट केले होते.
Bachchu Kadu: Anticipatory bail दरम्यान, बच्चू कडू यांनी त्यांचे वकिल अॅड. डॉ. महेश देशमुख यांच्या माध्यमातून अचलपूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सविस्तर युक्तिवाद झाला. बचाव पक्षाने मांडलेली बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने अखेर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.