अलवर
Delhi Mumbai Expressway accident दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील चॅनल 100 इंटरचेंज पुलाजवळ मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. पिनान गावाजवळ एक प्रवासी बस आणि रसायनांनी भरलेल्या ट्रकची जबर धडक झाली. यात चार जणांचा मृत्यू तर 30 प्रवासी जखमी झाले. ही घटना अलवरच्या राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. जखमींपैकी अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने मृतकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इंदूरहून दिल्लीला जात होती. अचानक झालेल्या अपघातामुळे प्रवाशांना सावरता आले नाही. घटनेची माहिती मिळताच, राष्ट्रीय महामार्गाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकेने तात्काळ पिनान येथील आदर्श सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रथमोपचारानंतर गंभीर जखमींना उच्चस्तरीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, अतिवेग आणि निष्काळजीपणा ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते.