फ्रेंचायझीत ‘धुरंधर’ची कमाल... सिनेसृष्टीत रचला नवा इतिहास

३००० कोटींचा टप्पा पार

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Dhurandhar भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद ठरणारी एक ऐतिहासिक कामगिरी ‘धुरंधर’ या चित्रपट फ्रेंचायझीने साध्य केली आहे. जागतिक पातळीवर तब्बल ३००० कोटी रुपयांचा गल्ला पार करत या मालिकेने भारतीय सिनेमाच्या यशाला नवे परिमाण दिले आहे. आतापर्यंत केवळ कल्पनेत असलेला हा आकडा ‘धुरंधर’ने प्रत्यक्षात साकारला असून, व्यावसायिक यशाबरोबरच भारतीय चित्रपटांची वाढती जागतिक ताकदही अधोरेखित केली आहे.
 

Dhurandhar  
या यशाची मुहूर्तमेढ ५ डिसेंबर २०२५ रोजी ‘धुरंधर’ या पहिल्या भागाच्या प्रदर्शानाने रोवली गेली. चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडीत काढले. देशांतर्गत बाजारपेठेत या चित्रपटाने ८४०.२० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन करत १००० कोटींहून अधिक ग्रॉस कमाई केली. परदेशातही चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जवळपास २९९.५० कोटी रुपयांची कमाई झाली. एकूण मिळून पहिल्या भागाने १३०७.३५ कोटी रुपयांचा जागतिक गल्ला जमवला.
पहिल्या भागाच्या यशानंतर अवघ्या चार महिन्यांत ‘धुरंधर २: द रिवेंज’ प्रदर्शित झाला आणि या फ्रेंचायझीला आणखी मोठी झेप मिळाली. भव्य निर्मिती, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सादरीकरण आणि प्रभावी अभिनयामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा खिळवून ठेवले. देशांतर्गत बाजारपेठेत १०८३.६५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन करत या चित्रपटाने एका भाषेतील चित्रपटासाठी विक्रमी कमाई नोंदवली. जागतिक स्तरावर या भागाने १७१२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
 
 
१३ एप्रिल २०२६ पर्यंत Dhurandhar  उपलब्ध आकडेवारीनुसार ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या दोन्ही चित्रपटांनी मिळून भारतात १९२३.८५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन, २३०५.३५ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन आणि परदेशात ७१४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे या फ्रेंचायझीची एकूण जागतिक कमाई ३०१९.३५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.या यशामुळे ‘धुरंधर’ने भारतीय सिनेमातील इतर गाजलेल्या फ्रेंचायझींनाही मागे टाकले आहे. ‘बाहुबली’ मालिकेने सुमारे २४३८ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘पुष्पा’ मालिकेचा गल्ला २०९२.२० कोटी रुपयांपर्यंत मर्यादित राहिला होता. त्या तुलनेत ‘धुरंधर’ने आघाडी घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या मते, ‘धुरंधर’चे हे यश भारतीय चित्रपटांच्या जागतिक स्वीकारार्हतेचे प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणावरची निर्मिती, प्रभावी कथा आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी यांचा योग्य संगम साधल्यास भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर अधिक मोठी झेप घेऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.