तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Dr Babasaheb Ambedkar Jayanti भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील संविधान चौकातील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला माजी मंत्री मदन येरावार, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रिददर्शनी उईके, नगरसेवक तथा गटनेते नितीन गिरी, नगरसेवक पंकज देशमुख व देवानंद पवार यांनी अभिवादन केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त यवतमाळ येथील संविधान चौक येथे त्यांच्या स्मारकासमोर भीमगर्जना ढोलताशा व ध्वज पथकाच्या वतीने अभिमानपूर्वक मानवंदना देण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त संविधानिक युवा फाऊंडेशनच्या वतीने शहरातील डॉ. आंबेडकर चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेचा संदेश देणाèया या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी आमदार किसन वानखेडे, नगर परिषद अध्यक्ष तेजश्री जैन, माजी आमदार प्रकाश देवसरकर, माजी आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजय खडसे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, भाजपा शहर अध्यक्ष अतुल खंदारे, अॅड. संतोष जैन, पत्रकार राजू गायकवाड, शैलश ताजवे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.
या रक्तदान शिबिरासाठी नांदेड येथील हुजूर साहेब ब्लड सेंटर यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. सकाळपासूनच युवक-युवतींसह विविध घटकांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले. दुपारपर्यंत एकूण 92 दात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
या उपक्रमासाठी संविधानिक युवा फाऊंडेशनचे मार्गदर्शक कृष्णा लाबंटिळे, अध्यक्ष सुनील भांडवले, उपाध्यक्ष शैलेश लांबटिळे, सचिव प्रशांत सूर्यवंशी तसेच सदस्य आकाश लाबंटिळे, अमित भांडवले, कन्हय्या खंदारे, विक्की काळे, ओंकार सूर्यवंशी, अनुराग जोगदंड आणि जालिंदर गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी करण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला. अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती वाढत असून, गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मोठी मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दिग्रसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
ज्ञान, संयम आणि समतेचे प्रतीक असलेल्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंगळवार, 14 एप्रिलला 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. ‘जयभीम’च्या घोषाने दिग्रस नगरी दुमदुमली.
येथील जुन्या नगर परिषदे जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हजारोंनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. समता पर्वाच्या माध्यमातूनच गेल्या तीन दिवसांपासून विविध समाजप्रबोधनाचे कार्यक्रम पार पाडत दुपारी 12 वाजता नगर परिषद अध्यक्ष पंचशीला इंगोले तथा शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. शाळा महाविद्यालये तसेच अनेक बौद्ध विहारात अभिवादन करण्यासाठी शेकडोजन एकत्र आले होते. आंबेडकरवादी लोक 14 एप्रिलला ‘समता दिन’ म्हणून तर महाराष्ट्र शासन ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा करते.
येथील पुतळा समिती व समता पर्वाच्या पुढाकारात संध्याकाळी वाजतगाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत असताना ठिकठिकाणी लोकांनी थंड पाणी, चहा फराळची व्यवस्था करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला.
13 एप्रिल रोजी संध्याकाळी, तसेच मंगळवार, 14 एप्रिल रोजी सकाळी दिल्या गेलेल्या मानवंदनेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, हे भीमगर्जना ढोलताशा व ध्वजपथक हे यवतमाळ जिल्ह्यातील बहुजन समाजाचे पहिले असे पथक असून, सामाजिक चळवळीला नवी दिशा देणारे ठरत आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व पथकाचे पथक प्रमुख तथा नगर पालिकेचे गटनेते डॉ. नीरज वाघमारे यांनी केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांची जपणूक करत समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मिरणूक मार्गावर जागो-जागी अन्नदान करण्यात आले होते.