Fake sports certificate महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवामध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नाही, त्यामुळे बोगस प्रमाणपत्राना पूर्णपणे आळा बसणार आहे.
Fake sports certificate संबंधित विभागाने दिलेल्या माहितीनुसार खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि मूळ डेटाशी ती जुळल्यास, अवघ्या २४ तासाच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. दरम्यान, प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय कोड असेल, जो स्कॅन करून संबंधित नियुक्ती प्राधिकारी प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील. विशेषतः महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही, ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्याकडून प्रमाणपत्राची पडताळणी केलेली आहे, त्यांनी यापुढे शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे.