- अन्नाभाऊ साठे नगरातील मांग-गारोडी समाजाला मिळाले हक्काचे घर
गोंदिया,
Gondia: Gharkul गोंदियाच्या कुडवा येथील अण्णाभाऊ साठेनगरातील मांग-गारोडी समाजातील २५ लाभार्थ्यांना घरकुलाच्या रुपाने हक्काचे घर मिळाले असून सोमवारी १३ एप्रिल रोजी या लाभार्थ्यांनी एकाच वेळी सामुहिक गृहप्रवेश केला. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाद्वारे ८ ते १४ एप्रिल या कालावधीत आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सामाजिक समता सप्ताह’ निमीत्ताने हा गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.
Gondia: Gharkul मांग-गारोडी समाजाच्या उत्थानासाठी समाज कल्याण विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. दरम्यान, जवळपास ४० कुटुंब अनेक वर्षांपासून कुडवा ग्रामपंचायत अंतर्गत अन्नाभाऊ साठेनगरात राहत असून हा समाज मुख्य प्रवाहापासून आणि शिक्षणापासून वंचित आहे. सदर समाजाच्या वस्तीत मुलभूत सुविधा तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे/ओळखपत्रे नव्हती. यावर समाज कल्याण विभागाने या समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करुन रमाई आवास (ग्रामीण) योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करुन २५ घरकुलांचे बांधकाम करुन दिले. विशेष म्हणजे, आतापर्यंत या समाजातील ३२ कुटुंबांना राशन कार्ड, ७९ जातीचे व अधिवास प्रमाणपत्र, ६८ आधार कार्ड देण्यात आले असून आता रमाई आवास (ग्रामीण) योजनेअंतर्गत २५ घरकुल त्यांना प्राप्त झाली आहे. दरम्यान, सोमवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुंगानंथम यांच्या अध्यक्षतेत सामूहिक गृहप्रवेश सोहळा आयोजित करून सर्व लाभार्थ्यांचे गृहप्रवेश करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर, कुडवाचे सरपंच बाळकृष्ण पटले, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी २५ घरकुलांचा मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या शुभहस्ते रिबीन कापून व भारतीय संविधानाची प्रास्ताविका लाभार्थी कुटुंबांना भेट देऊन गृहप्रवेश करण्यात आले.