महाराष्ट्रात मराठी अनिवार्य...नाही तर परवाने रद्द!

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Marathi is mandatory in Maharashtra राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून, येत्या १ मेपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. महाराष्ट्र दिनापासून लागू होणाऱ्या या निर्णयानुसार, परवानाधारक चालकांना मराठी बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक राहणार आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून चालकांच्या परवान्यांची पडताळणी केली जाईल. या वेळी संबंधित चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आहे की नाही, याची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येणार आहे. ज्यांना मराठी येत नाही, अशा चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
Marathi is mandatory in Maharashtra
 
जाणीवपूर्वक मराठी बोलण्याचे टाळतात
या निर्णयाबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, परवाना देताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये अनेक चालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. काही जण जाणीवपूर्वक मराठी बोलण्याचे टाळतात, असेही निदर्शनास आले आहे. आपण ज्या भागात काम करतो, त्या ठिकाणची भाषा शिकणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या भाषेचा अभिमान बाळगतानाच इतरांच्या भाषेचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे १ मेपासून सर्व परवानाधारक चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येणे अनिवार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल. याशिवाय, फेरतपासणीदरम्यान चालकांची भाषा कौशल्ये कसून तपासली जाणार आहेत.दरम्यान, या मुद्द्याला चालना मिळण्यामागे नरेंद्र मेहता यांनी केलेल्या तक्रारीचा संदर्भ दिला जात आहे. काही परप्रांतीय आणि परदेशी व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखले मिळवून परवाने घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवरच सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.