मेलोनींचा मोठा निर्णय...इस्रायलसोबत संबंध तोडले

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
रोम,
Meloni breaks ties with Israel इटलीच्या राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी इस्रायलसोबतचे संरक्षण करार पुढील काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जाहीर केली आहे. मध्य पूर्वेत वाढत चाललेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा संदर्भ देत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इस्रायलसोबत सुरू असलेले संरक्षणविषयक करार आपोआप नूतनीकरण न करता ते थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या करारांबाबत सविस्तर माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
 
 
Meloni breaks ties with Israel
 
 
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मेलोनी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता चर्चेला अधिक वेग देण्याची गरज व्यक्त केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवादाचा मार्ग अवलंबणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरळीत सुरू करण्यावरही भर देण्यात आला आहे. ही सामुद्रधुनी इंधन आणि खतांच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाची असल्याने तिचे बंद असणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर इटलीतील वेरोना येथे पत्रकारांशी बोलताना मेलोनी यांनी परिस्थिती स्थिर करण्यासाठी सर्व संबंधित देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, प्रादेशिक शांतता प्रस्थापित करणे आणि जागतिक पुरवठा साखळी सुरळीत ठेवणे हे सध्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.