मुंबई
Mumbai triple murder पूर्व वैमनस्य आणि किरकोळ वादातून मुंबईत घडलेल्या तीन वेगवेगळ्या हत्यांच्या घटनांनी संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दादर, माटुंगा आणि खेरवाडी परिसरात घडलेल्या या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तीनही प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही आरोपींना अटक केली आहे.
दादर परिसरात पूर्व वैमनस्यातून एका २८ वर्षीय तरुणाची पत्नीसमोरच निर्घृण हत्या करण्यात आली. अंकुश आंबेकर असे या तरुणाचे नाव असून गौरव सनस याच्यासोबत असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. रविवारी अंकुश आपल्या पत्नीसोबत मित्राला भेटण्यासाठी सयाजी वाडी येथे जात असताना आरोपींनी त्याची वाट अडवली. त्यानंतर गौरव सनस, अनिल पटेल, राजेश पटेल, सिद्धेश पटेल, साहिल राणे, अविनाश खवरे आणि अजय यादव या सात जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दादर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.दुसरीकडे, माटुंगा परिसरात पार्किंगच्या छोट्या वादातून ज्येष्ठ नागरिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेश वाघेला (वय ६५) असे मृताचे नाव असून दादर टाटा येथील पुलाखाली वाहन उभे करण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. वाघेला यांनी आरोपींना समज देण्याचा प्रयत्न केला असता साहिल घाडगे आणि शाहबाज मो. रफिक शेख यांनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वाघेला यांचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
तिसरी घटना खेरवाडी Mumbai triple murder परिसरातील कल्पतरू स्पार्कल्स येथे घडली असून जुन्या शाब्दिक वादातून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. अभिनव चौधरी असे मृत युवकाचे नाव असून दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे.एकाच दिवशी शहरातील तीन वेगवेगळ्या भागांत घडलेल्या या हत्याकांडांमुळे मुंबई हादरली असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे. किरकोळ वादातून वाढणाऱ्या हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र या घटनांमुळे शहरातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.