नवी दिल्ली,
Narendra Modi डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रउभारणीतील प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य पिढ्यानपिढ्या एक न्याय्य आणि प्रगतीशील समाज घडवण्यासाठी प्रेरणा देत राहील. वंचित समुदायांच्या सक्षमीकरणाला सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, आमचे सरकार बाबासाहेबांच्या समानता, संविधान आणि अंत्योदय या आदर्शांना पुढे नेत आहेत. त्यात पंचतीर्थाचा विकास, संविधान दिनाची घोषणा आणि स्टँड-अप इंडिया, मुद्रा व भीम अॅपसारख्या उपक्रमांद्वारे वंचित समुदायांचे सक्षमीकरण केले जात आहे. बाबासाहेबांमुळेच मी पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास करू शकलो. आंबेडकर यांचा सर्वात मोठा वारसा म्हणजे असा भारत, जिथे जन्म नव्हे, तर संधी एखाद्याची प्रगती ठरवते. आमच्या सरकारने बाबासाहेबांशी संबंधित सर्व स्थळांचा विकास आणि आधुनिकीकरण केले, जेणेकरून नवीन पिढीला त्यांचे जीवन आणि विचार अधिक जवळून समजू शकतील. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित केला. संविधानाची मूल्ये जनतेपर्यंत पोहोचवणे आणि संविधानाचे मुख्य शिल्पकार म्हणून आंबेडकरांचा सन्मान करणे, हा यामागील उद्देश होता.
सामाजिक, आर्थिक विचारांची अंमलबजावणी
सरकारी योजनांचा Narendra Modi संदर्भ देताना मोदी यांनी म्हटले की, स्टँड-अप इंडिया आणि मुद्रा योजना यांसारख्या उपक्रमांनी वंचितांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. भीम अॅपद्वारे प्रत्येक गावात डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे आर्थिक समावेशाला प्रोत्साहन मिळाले आहे. आंबेडकरांच्या सामाजिक आणि आर्थिक विचारांची आधुनिक धोरणांद्वारे अंमलबजावणी केली जात आहे.
संसदेतील कार्यक्रमात खडगे यांच्यासोबत संवाद
संसद भवन परिसरात आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान, मोदी आणि इतर नेत्यांनी डॉ. आंबेडकरांचे स्मरण केले आणि पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मोदी आणि खडगे यांच्यातील संवाद आणि हास्यविनोदाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.