मुंबई
Pawan Chaure अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात, मात्र ते प्रत्यक्षात साकार करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात. अशाच जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एका खेड्यातील तरुणाने रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. पवन चौरे हा अभिनेता आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या १५ मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
झी५ वरील अंधा प्यार 2.0 या वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेला पवन चौरे याचा हा चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. एका छोट्या खेड्यातून आलेल्या या तरुणाने अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करताना अनेक अडचणींवर मात केली आहे. या प्रवासाबद्दल बोलताना पवन म्हणाला की, कुटुंब, मित्र आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय हे यश शक्य झाले नसते.
‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती त्रिमूर्ती फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार आणि राजा पांडुरंग पंडितपवार हे निर्माते असून शिवाजी केशव पाटील सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केले आहे.
चित्रपटाची कथा ही Pawan Chaure चित्रपटात हिरो बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या संघर्षावर आधारित आहे. विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पवन चौरेसोबतच प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख आणि घनश्याम दरवडे (छोटा पुढारी) यांसारख्या कलाकारांची फळी या चित्रपटात दिसणार आहे.