वर्धा,
President Draupadi Murmu राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरूवार १६ एप्रिल रोजी वर्धेत येत आहेत. त्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देणार आहेत. तसेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहे. याच दौर्यामुळे १६ रोजी महामार्गसह काही अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
गुरूवार १६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सेवाग्राम व वर्धा शहरातील काही महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार आहे. महिला आश्रम ते सेवाग्राम मार्ग तसेच म्हसाळा बायपास हा मार्ग काही कालावधीसाठी पूर्णतः बंद राहील. दत्तपूरहून नागपूरकडे जाणारा रस्ता तसेच काही महामार्गांवरील वाहतूक बंद ठेवली जाईल. नागपूरकडे जाणार्या वाहनांसाठी समृद्धी महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी वाहतूक विभागाला आवश्यक सूचनाही दिल्या आहे. शहरातील प्रत्येक चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उन्हाची तमा न बाळगता पोलिस अधिकारी व कर्मचारी खडा पहाराच देणार आहे.
महामार्ग २०-२० मिनिटांसाठी बंद
शहरालगतचे काही महामार्ग सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत २० मिनिटांसाठी अधूनमधून बंद ठेवले जाणार आहे. यात यवतमाळ-वर्धा-नागपूर दरम्यानच्या बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचा समावेश आहे. नागपूरहून वर्धा-यवतमाळकडे जाणारा मार्गही याच कालावधीत २० मिनिटांसाठी बंद राहील. सेवाग्राम मेडिकल चौक ते मांडगाव-पवनार मार्ग आणि हेलिपॅड ते बापूकुटी मार्गही राष्ट्रपतींचा ताफा जात असताना २० मिनिटांसाठी बंद ठेवले जातील. ताफा पुढे गेल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.