भारतीय कामगार चळवळीचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रवींद्र गणेशे.

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
रा.स्व.संघ शाखेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम 
बुलढाणा 
Ravindra Ganeshe डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कामगार विषयक दृष्टिकोन हा आर्थिक सामाजिक व राजकीय या त्रिकोणावर आधारित होता. ते कामगारांना केवळ वेतन मिळवणारे श्रमिक मानत नव्हते तर स्वाभिमान सन्मान आणि समान हक्क असलेला मानवी घटक मानत होते. आज भारतातील अनेक कामगार कायदे डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे फळ आहे. त्यामुळे ते केवळ वंचित मुक्ती दाता नव्हते तर ते खर्‍या अर्थाने भारतीय कामगार चळवळीचे शिल्पकार होते. असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष रवींद्र गणेशे यांनी केले.
 
 
ganese
 
Ravindra Ganeshe राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर शाखेच्या वतीने येथील विष्णूवाडीतील शारदा मंदिरात डॉटर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .मंचावर सामाजिक कार्यकर्ते अँड. साहेबराव सरदार ,नगर संघ चालक महेश पेंडके व प्रमुख वक्ते रवींद्र गणेशे यांची प्रमुख उपस्थिती होती. रवींद्र गणेशे पुढे म्हणाले की प्रबोधन व परिवर्तन प्रक्रियेची चौकट मोडून सामाजिक क्रांतीची वाटचाल बहुजन समाजा पर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा फुलेंनी केली. त्यांच्या या कार्याला छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचे समर्थन व सक्रिय साथ लाभली. तर महर्षी वी.रा. शिंदे यांचे योगदान ही महत्त्वपूर्ण होते. परंतु प्रबोधन व परिवर्तनाची ही चळवळ समाजाच्या तळागाळातील व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची क्रांतिकारी कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. या चळवळीचा वाटचालीला निर्णायक वळण देऊन शेवटच्या टप्प्यापर्यंत नेऊन ठेवले. संघ प्रचारक स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या एका पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्लीतील भाषणाची साक्ष देताना सांगितले की डॉ. आंबेडकर व डॉ.हेडगेवार या दोघांचीही कार्यपद्धती अलगअसली तरी दोघांची दिशा व गंतव्य स्थान हे एकच होते.या राष्ट्रात सामाजिक समरसता प्रस्थापित करणे हा या दोघांचाही जीवित हेतू होता. त्यामुळे संघाला अभिप्रेत असलेली सामाजिक समरसता ही बाबासाहेबांना सुद्धा अभिप्रेत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आपलेपणा होता. याचे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या समतेच्या आणि बंधुतेच्य मार्गावरून चालत आपण एक समर्थ ,सुवर्ण व सशक्त भारत घडवू असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन नगर कार्यवाह रवींद्र जाधव यांनी केले. अमृत वचन प्राध्यापक रिठे यांनी सादर केले या कार्यक्रमाला नगरातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता अनंत उबाळे यांच्या भीमवंदनने झाली.