फायनल झाले... ‘सालबर्डी’ १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
मुंबई
Salbardi movie मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन आणि वेगळ्या विषयांवर चित्रपट सादर करणारे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांचा नवा चित्रपट ‘सालबर्डी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. येत्या १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रहस्य आणि थरार यांची प्रभावी सांगड घालत चौधरी यांनी यावेळी एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.
 

Salbardi movie  
चित्रपट ही केवळ कथा नसून ती भावना, दृश्य आणि विचारांची एकत्रित गुंफण असते. या गुंफणीत प्रत्येक घटक योग्य ठिकाणी बांधण्याचे कौशल्य दिग्दर्शकाकडे असते, आणि त्यामुळेच चित्रपटाच्या यशामागे दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आणि मांडणी महत्त्वाची ठरते. ‘सालबर्डी’च्या माध्यमातून रमेश चौधरी यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून हा अनुभव अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे.
यापूर्वी ‘गुल्हर’, ‘बाबो’ आणि ‘पाणीपुरी’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे ओळख निर्माण केलेल्या चौधरी यांचा ‘सालबर्डी’ हा चित्रपट प्रेक्षकांना एका गूढ आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. स्वतः चौधरी यांनी या चित्रपटाबाबत सांगितले की, त्यांना नेहमीच वेगळ्या कथा मांडायला आवडतात आणि ‘सालबर्डी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी उलगडत जाणारा रहस्यमय अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो विचार करायला भाग पाडणारा आहे.
 
 
चित्रपटाची कथा Salbardi movie  गूढ घटनांच्या मालिकेतून पुढे सरकत जाते. प्रत्येक प्रसंगात दडलेले रहस्य, अनपेक्षित वळणं आणि अंगावर काटा आणणारे क्षण यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते. ‘सालबर्डी’ हा केवळ थरारपट नसून मनात प्रश्न निर्माण करणारा आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारा अनुभव देणारा चित्रपट ठरणार असल्याचे सांगितले जाते.दुर्गम महाराष्ट्रातील ‘सालबर्डी’ गावाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत भय आणि रहस्याचा प्रभावी संगम पाहायला मिळणार आहे. चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर आणि प्रवीण डाळिंबकर यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांच्या सहकार्याने नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट साकारला आहे. ‘सालबर्डी’ हा चित्रपट रमेश चौधरी यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रेक्षकांच्या प्रतिसादाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.