युक्रेनने माणसांशिवाय जिंकले रणांगण!

रशियन तळ तव्यात घेतल्याचा दावा

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
कीव,
Ukraine won the battlefield without men रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या मते, युद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच केवळ मानवरहित यंत्रणांच्या मदतीने रशियन सैन्याला शरण येण्यास भाग पाडण्यात आले असून त्यांचा एक तळही ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. या कारवाईत मानवी सैनिकांचा थेट सहभाग नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर दिसून येत आहे. झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, ड्रोन आणि जमिनीवर चालणाऱ्या रोबोटिक यंत्रणांच्या साहाय्याने ही मोहीम पार पाडण्यात आली. या कारवाईत शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करून त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि युक्रेनियन सैन्याने त्या ठिकाणाचा ताबा घेतला.
 
 
 
kiv
 
भविष्यातील युद्धाचे स्वरूप बदलणार
युक्रेनमधील शस्त्रनिर्मिती क्षेत्राच्या कार्यक्रमात बोलताना झेलेन्स्की यांनी सांगितले की, देशाची संरक्षण क्षमता मोठ्या वेगाने वाढत आहे. केवळ लहान ड्रोनच नव्हे, तर लांब पल्ल्याची शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि विविध प्रकारच्या रोबोटिक यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. देशात दरवर्षी मोठ्या संख्येने ड्रोन तयार करण्याची क्षमता निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. समाजमाध्यमांवर त्यांनी काही छायाचित्रे प्रसिद्ध करत, भविष्यातील युद्धाचे स्वरूप बदलत असल्याचे संकेत दिले. या नव्या पद्धतीत मानवी जीवितहानी कमी होत असून युद्ध अधिक तांत्रिक स्वरूपाचे होत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, या मोहिमेत युक्रेनच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच गेल्या तीन महिन्यांत युक्रेनने विविध प्रकारच्या जमिनीवरील रोबोटिक यंत्रणांच्या साहाय्याने वीस हजारांहून अधिक मोहिमा पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे भविष्यातील युद्धात मानवरहित यंत्रणांचे महत्त्व अधिक वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.