नवी दिल्ली,
Vaibhav Suryavanshi to be in Indian team तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशी लवकरच भारतीय संघाच्या जर्सीत मैदानावर उतरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तो आयपीएलमध्ये आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आंतरराष्ट्रीय सामने पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याला वरिष्ठ संघात स्थान मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे. अजून अंतिम निर्णय व्हायचा असला तरी, संधी मिळाल्यास आपल्या पहिल्याच सामन्यात तो विक्रम घडवू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेत एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने असतील. त्यानंतर संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार असून तेथे दोन टी-२० सामने खेळवले जातील. या दौऱ्यासाठी संघाची घोषणा होताना वैभव सूर्यवंशीच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवड प्रक्रियेत त्याच्यासह इतर काही खेळाडूंची नावेही चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे.
अलीकडेच भारताने टी-२० विश्वचषक जिंकला असून आता सर्वांचे लक्ष पुढील एकदिवसीय विश्वचषकावर केंद्रित झाले आहे. त्यामुळे टी-२० सामने तुलनेने कमी होतील आणि वरिष्ठ खेळाडू एकदिवसीय संघात व्यस्त राहतील. अशा परिस्थितीत नवोदित आणि तरुण खेळाडूंना टी-२० स्वरूपात संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करत असले तरी आयर्लंड दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एखाद्या नवख्या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, आणि त्या पर्यायांमध्ये वैभव सूर्यवंशीचे नावही चर्चेत आहे. नुकताच पंधरा वर्षांचा झालेल्या या खेळाडूला जर आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणाची संधी मिळाली, तर तो भारताकडून खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरेल. सध्या वैभव उत्कृष्ट फॉर्मात असून त्याची सातत्यपूर्ण कामगिरी कायम राहिली, तर निवड समिती त्याला लवकरच संधी देऊ शकते. आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन तरुण खेळाडूंना तयार करण्याची रणनीती आखली जात असून त्याचाच भाग म्हणून वैभवसारख्या प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.