वर्धेत उन्हाचे चटके; पारा ४३.५ अंश

भर उन्हात बाहेर पडणे टाळा

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
वर्धा,
Wardha temperature ढगाळी वातावरण निवळताच जिल्ह्यात ऊन्हाने जोर धरण्यास सुरूवात केली आहे. सध्या जिल्ह्याच्या कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडला असून सोमवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ४३.०१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले तर मंगळवार १४ रोजी ४३.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असल्याने नागरिकांनीही भर उन्हात घराबाहेर पडण्याचे टाळावे. घरातील वृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 

Wardha heatwave, Wardha temperature 
अंगाला चटके देणारी आणि जीवाची लाही लाही करणारी ऊन सध्या जिल्ह्यात आहे. मागील काही दिवस जिल्ह्यात ढगाळी वातावरण होते. शिवाय काही परिसरात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊसही कोसळला. सध्या दुपारच्या सुमारास सूर्य जणू आग ओकू पाहत असल्याने उकड्याचा चांगलाच त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आगामी काळातही उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तर बांधकाम कामगार, शेतकरी, शेतमजुरांनी भर उन्हात काम करण्याचे टाळावे. शिवाय वेळोवेळी भरपूर पाणी प्यावे. पशुपालकांनी आपली जनावरे सावलीत थंड ठिकाणी बांधावी असेही आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
उष्णतेचा यलो अलर्ट
जिल्ह्यात सोमवारी ४३.०१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. आगामी दिवसात जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्याची शयता असून हवामान विभागाच्या नागपूर येथील वेध शाळेच्यावतीने शनिवार १८ रोजीला जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.