वर्धा,
krishnadham-temple : राज्यात अनेक महिला अधिकारी आहेत. केंद्र सरकारनेही नारीवंदन करून महिलांचा सन्मान वाढवला. साक्षात श्रीकृष्णानेही द्रौपदीला साडी पुरवली होती. स्थानिक कारला मार्गावरील हरिभाऊ वझूरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कृष्णधाम कृष्ण मंदिराचा बारावा वर्धापनदिनही महिलांच्या साक्षीनं साजरा झाला. ठाणे येथील गायक गायत्री जोशी यांनी मुक्ता नाडगौडा यांना सोबत घेत स्वराराधना केली. साधना उमाळकर यांनी निवेदनातून साधना समर्पण करत नारीशक्तीचा वेगळा अनुभव श्रीकृष्ण मंदिर स्थापना वर्धापनदिन कार्यक्रमात आला.

कृष्णभक्त संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ वझुरकर यांनी एक तपापूर्वी सुदामपुरी ते द्वारकाधीश मंदिर असा प्रवास केला. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या वैभवाला साजेसा त्यांच्या मंदिराच्या स्थापनेचा वर्धापन दिन देखील तसाच साजरा झाला. पताका, तोरणं, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईने मंदिर आणि मंदिर परिसर नटला सजला होता. बाराव्या वर्धापनदिनाला पुजेची जबाबदारी तिसर्या पिढीकडे सुपूर्द करीत पार्थ आणि अनय यांनी महाअभिषक केला. दुपारी विविध महिला भजन मंडळाचे भजनं झाले. रात्री ८ वाजता ठाणे येथील प्रसिद्ध गायिका गायत्री जोशी व मुता नाडगौडा यांनी भक्ती गीतांची माळ कृष्णाला अर्पण केली. राधिकेचे स्मरण करणारे मी राधिका प्रेमिका गाणे उपस्थितांची दाद मिळवून गेले. कार्यक्रम संपू नये असे वाटत असतानाच अवघा रंग एक झाला... या भैरवीत विठ्ठल नाम गजरात विलीन झाले.
साधना उमाळकर यांनी निवेदन केले. हरिभाऊ वझुरकर यांनी कलाकारांचा यथायोग्य सत्कार केला. आभार गौरी मोराणकर यांनी मानले.