नवी दिल्ली,
actress-forced-to-eat-beef : मल्याळम मनोरंजन विश्वातील अभिनेता शियास करीम सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे त्याच्यावर अभिनेत्री अनुमोल अनुकुट्टी हिला जबरदस्तीने बीफ खाण्यास भाग पाडल्याचा आरोप होत असून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमादरम्यान शियास करीम हा अनुमोलला वारंवार बीफ खाण्यास सांगताना दिसतो. मात्र अनुमोलने तिच्या वैयक्तिक आहाराचे कारण देत स्पष्ट नकार दिला. तरीही शियासने हा विषय सोडला नाही आणि तिच्या नकारावरून टोमणे मारत “तू भाजपमध्ये सामील झाली आहेस का?” असा प्रश्न विचारल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली. अनेकांनी शियासचे वर्तन “मजाक” नसून एखाद्याच्या वैयक्तिक निवडीचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काहींनी याला छळवणूक असेही संबोधले आहे.
वाद वाढल्यानंतर शियास करीमने स्वतःचे स्पष्टीकरण देत हा संवाद मित्रांमधील हलक्याफुलक्या विनोदाचा भाग असल्याचा दावा केला. त्याच्या मते, अशा प्रकारचे संभाषण त्यांच्या परिसरात सामान्य आहे आणि त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. तसेच, बीफ विषयावरून निर्माण झालेला वाद हा राजकीय वातावरणामुळे वाढवला गेला, असेही त्याने सांगितले.
सौजन्य: सोशल मीडिया
दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या वागणुकीबाबत आणि वैयक्तिक निवडींचा आदर करण्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.