एम्सचा दीक्षांत सोहळा उत्साहात

-गुणवंतात सर्वाधिक मुलीच -राष्ट्रपती येती घरा......

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
नागपूर, 
aiims-convocation-ceremony : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एम्समध्ये विविध अभ्यासक्रमात अव्वल आलेल्या डॉ. वेदावती बंद्योपाध्याय, डॉ. सुनकिर श्री हरीबाबू, प्रियंका, वैदेही जे. लोया, निकिता जोशी, तौसीफ अहमद लस्कर, अरसला परवीन या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पदवी प्रदान करण्यात आली.
 
 
15-april--AIIMS-(18)
 
 
 
एम्सचा हा दुसरा दीक्षांत कार्यक्रम होता. दीक्षांत समारंभात एकूण 210 विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या गौरवार्थ पदव्या व सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. यामध्ये 129 एमबीबीएस, 29 एमडी/एमएस, 35 बी.एस्सी., नर्सिंग, 5 एम.एस्सी. आणि 12 संलग्न व आरोग्यसेवा शाखांतील पदवीधरांचा समावेश आहे. मुलींचा टक्का अधिक असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपतींनी केला.
 
 
राष्ट्रपती येती घरा... असेच वातावरण आज मिहानमधील अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) होेते. केवळ डॉक्टर्स, तंत्रज्ञ, परिचारिका, कर्मचारीच नव्हे तर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्येही राष्ट्रपती येणार असल्याने राष्ट्रपती येती घरा... अशीच भावना ओसंडून वहात होती. मात्र, वैद्यकीय सेवा थांबलेली नव्हती.
 
 
केवळ बातम्यांमध्येच पाहत असल्याने (अनेकांनी तसेही पाहिले नव्हते) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रत्यक्षात कशा आहेत, अशीच उत्सुकता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये होती. प्रत्येकच जण राष्ट्रपतींना पाहण्यासाठी आसुलेला होता. राष्ट्रपती येणार असल्याने एम्समध्ये विशेष व्यवस्था होती. एरवी उघडे असणारे पहिल्या क्रमांकाचे प्रवेशद्वार आज केवळ राष्ट्रपतींसाठीच होते. इतरांना दुसèया क्रमांकाच्या फाटकातून प्रवेश देण्यात आला.
 
 
राष्ट्रपती येणार असल्या तरी वैद्यकीय उपचार बंद नव्हते. नेहमीप्रमाणे सकाळी ओपीडी, रुग्ण तपासणी सुरू झाली. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांना राष्ट्रपतींना पहायचे होते. सकाळी पावणेअकरा वाजेपासून रुग्ण व त्यांचे नातेवाईक इमारतीबाहेरील मोकळ्या भागात चातकाप्रमाणे वाट बघत होते.
 
 
धर्मशाळेकडील भागातही रुग्ण व त्यांचे नातेवाईक होते. मधला रस्ता बंद होता. राष्ट्रपतींचे आगमन झाले. कारमधील राष्ट्रपतींना पाहताना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी हात उंचावले. राष्ट्रपतींनीसुद्धा बंद काचेतून हात दाखवून प्रतिसाद दिला. त्या परत जातानासुद्धा असेच घडले.
 
 
राष्ट्रपती येणार म्हणून एम्समधील सभागृह आतून फुलांनी सजवले होते. डॉक्टर्स, विद्यार्थी व कर्मचाèयांत एक आगळाच उत्साह होता. कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांच्यासह सर्व डॉक्टर्स, कर्मचारी मागील काही दिवसांपासून राबत होते.