सेलू,
wahitpur village news तालुक्यातील वाहीतपूर गाव गावठी मोहा दारूच्या विळख्यात सापडले असून, या घातक व्यवसायामुळे संपूर्ण गावाचे सामाजिक आणि आरोग्याचे चित्र ढासळत चालले आहे. अशातच गावाच्या सीमेवर एक बोलका फलक झळकला. वाहितपुरात गायीचे दूध ५० रुपये लिटर सकाळी १ वाजेपर्यंत तर मोहाची दारू २४ तास १५० रुपये लिटरप्रमाणे मिळते. या बोलक्या फलकाने नागरिकांनी संताप व्यक्त करीत बुधवार १५ रोजी सकाळी ११ वाजता पोलिस अधीक्षकांना निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

गावात मोहाची दारू अक्षरशः खुलेआम विकली जात असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चालल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दारूच्या विळख्यात अडकून दरवर्षी दोन ते तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून घराघरात कलह, आर्थिक संकटे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचे चित्र आहे. गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून, संपूर्ण गावाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने छापेमारी करून या अवैध दारूच्या अड्ड्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन सेलू पोलिस ठाणे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सादर करण्यात आले असून, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवन यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
आतातरी प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून, या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष दिले नाही, तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाहीतपूर हे गाव विकासाच्या बाबतीत पुढे असले तरी गावाच्या सीमेवर लावलेला फलक काय सांगतो, हे महत्वाचे ठरत आहे. या फलकावर दूध ५० रुपये लिटर पण ते सकाळी, अन् मोहाची दारू १५० रुपये लिटर पण ती २४ तास मिळते, असा फलक लावला असून हा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा नाही का, हा विषय तालुयात चर्चेचा बनला आहे.