तभा वृत्तसेवा
उमरखेड,
bhim-jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त उमरखेड शहर अक्षरशः निळ्या रंगात न्हाऊन निघाले. ‘जय भीम’च्या बुलंद घोषणांनी आणि भीमगीतांच्या सुरांनी संपूर्ण औदुंबरनगरी दुमदुमून गेली. प्रत्येकाच्या चेहèयावर अभिमान, डोळ्यांत कृतज्ञता आणि मनात महामानवांविषयी अपार श्रद्धा दिसून येत होती. शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकांनी या सोहळ्याला विशेष तेज दिले.
शहरातील बोरबन येथून निघालेल्या मिरवणुकीत बँजो पथकाच्या तालावर तरुणाई थिरकत होती. महिलांनीही मोठ्या उत्साहात त्यात सहभाग घेतला. ही मिरवणूक पुसद रोड कृष्णमंदिर, माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मार्गक्रमण करीत असताना रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या नागरिकांनी अभिवादन केले.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डातून निघालेली दुसरी मिरवणूक ही नाग चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मार्गक्रमण करत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. या भागातून जाताना ‘जय भीम’ घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
उमरखेडमधील ही भीमजयंती केवळ उत्सव नव्हती, तर ती समता, बंधुता आणि सामाजिक जागृतीचा जागर होती. संपूर्ण मिरवणूक मार्गावर विविध संघटनांनी पाणी, सरबत व फराळाची व्यवस्था केली. या सेवाभावामुळे अनुयायांचा उत्साह द्विगुणित झाला. या प्रसंगी पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कार्यक्रम शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडला.
भाजपाच्या वतीने खिचडी वाटप
शहरातील संजय गांधी चौक येथे ढोल-ताशा व बँजोच्या गजरात नाचत गाजत येत असताना थकलेल्या अनुयायांसाठी येथील भाजपाच्या पदाधिकार्यांच्या वतीने खिचडी व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी आमदार किसन वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, दत्तात्रेय काळे, राधेश्याम भट्टड, विवेक कन्नावार, रवींद्र वाठोरे यांनी उपस्थित राहून खिचडी वाटप केले.