नवी दिल्ली,
air-india : देशाची प्रमुख विमान सेवा एअर इंडिया सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून, कंपनीने मोठ्या तोट्यानंतर आता आपल्या भागधारकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात एअर इंडियाला तब्बल सुमारे 2.4 अब्ज डॉलर (२२ हजार कोटी रुपयांहून अधिक) इतका मोठा तोटा झाला आहे. अपेक्षेपेक्षा अधिक झालेल्या या तोट्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आपल्या प्रमुख भागधारक असलेल्या टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्याशी नव्या निधीसाठी चर्चा सुरू केली आहे. मात्र, किती निधी मिळणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
कंपनीच्या तोट्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाला लांब मार्गांचा वापर करावा लागला, ज्यामुळे इंधन खर्च वाढला. याशिवाय जागतिक तणाव, ऑपरेशनल अडचणी आणि काही मोठ्या दुर्घटनांमुळेही कंपनीच्या कामगिरीवर परिणाम झाला.
सध्या एअर इंडिया टाटा समूहाच्या मालकीखाली पुनर्रचना आणि सुधारणा प्रक्रियेत आहे. मात्र, वाढत्या तोट्यामुळे कंपनीसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले असून, नव्या गुंतवणुकीवरच तिच्या पुढील वाटचालीचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे.