खंडणीसाठी व्यावसायिकाला करंट देत मारले

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
कोल्हापूर,
Businessman killed for ransom कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात खंडणीसाठी केलेल्या अपहरणानंतर एका व्यावसायिकाची करंट देत निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. ४० वर्षीय भरतेश राजगोंडा टोपगोंडा असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या अपहरणानंतर अमानुष छळ करून जीव घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
 
 
ransom NASHIK
 
मिळालेल्या माहितीनुसार, दानोळीतील शेरी मळा भागात ही घटना घडली. भरतेश हे रात्री उशिरा आपल्या घरी परतत असताना काही अज्ञातांनी त्यांना अडवून जबरदस्तीने सोबत नेले. त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या दूरध्वनीवरून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. आरोपींनी पैसे ठराविक ठिकाणी आणण्यास सांगितले, मात्र वारंवार ठिकाण बदलत त्यांनी नातेवाईकांची दिशाभूल केली. काही काळानंतर दूरध्वनी बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला.
 
 
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला. काही वेळातच शेरी मळा परिसरात रस्त्यालगत उसाच्या शेताजवळ भरतेश यांच्या चपला आणि वाहन आढळून आले. यानंतर परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असता उसाच्या शेतातच त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेची वार्ता समजताच गावात एकच खळबळ उडाली आणि संतप्त नागरिकांनी तातडीने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेत निषेध नोंदवला. सुरुवातीला बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आल्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची गती वाढवली. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या गुन्ह्यामागील संपूर्ण कट उघड झाला. या प्रकरणी टिल्लू पवार आणि राजदीप ताडे या दोघांना अटक करण्यात आली आहे.