समाजाच्या नसांत शिरतोय नशेचा कॅन्सर

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
 
अग्रलेख...
 
 
 
cancer of addiction कॅन्सर हा शब्द ऐकला की सर्वांच्या अंगावर काटा येतो. कर्करोग किंवा कॅन्सर हा दुर्धर आजार आहे. तो एकदम दिसत नाही. तो शांतपणे वाढतो, आतून पोखरतो आणि जेव्हा त्याची जाणीव होते, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. बहुतेकदा तो जीवघेणा ठरतो. भारतात अमली पदार्थांचे व्यसन हा असाच एक ‘सामाजिक कॅन्सर’ बनत चालला आहे. तो वरवर दिसत नाही, पण समाजाच्या मुळावर उठला आहे. एकेकाळी पंजाब हे राज्य अमली पदार्थांच्या व्यसनामुळे ‘उडता पंजाब’ म्हणून कुप्रसिद्ध झाले होते. ‘उडता पंजाब’ नावाचा चित्रपटही या विषयावर आला होता. त्या वेळी अनेकांना वाटले होते की हा प्रश्न केवळ पंजाब या एका राज्यापुरता मर्यादित आहे. पण आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. ड्रग्जचा विळखा आता देशभर पसरला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि औद्योगिक राज्यातही ड्रग्जचा अवैध व्यापार झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये दररोज कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशात एक साधा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो आणि तो असा की, इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले जात असतील तर नजरेआड किती जात असतील?
 
 
 
cancer of addiction
 
 
जागतिक स्तरावर पाहिले तर ही समस्या दहशतवादाएवढीच गंभीर आहे. जागतिक संघटनांच्या अहवालानुसार, जगभरात कोट्यवधी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अमली पदार्थाच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन नासते आहे. ड्रग्जचा व्यापार हा अब्जावधी डॉलर्सच्या काळ्या अर्थव्यवस्थेचा भाग आहे. नैसर्गिक अमली पदार्थांच्या साथीने सिंथेटिक ड्रग्ज उदाहरणार्थ- मेथ (मेथॅम्फेटामाइन), एमडीएमए (मेथॅलिनडायॉक्सिमेथँफेटामाईन), फेंटानिल यांचा वापर झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत ‘झोंबी ड्रग्ज’ म्हणून ओळखल्या जाणाèया अमली पदार्थांनी तर भीषण स्थिती निर्माण केली आहे. त्याचे व्यसन करणारी माणसे जिवंत असूनही अक्षरशः निर्जीव वाटावीत, अशी अवस्था होते. भारतातही त्याची उदाहरणे दिसू लागली आहेत. तरुण लोकसंख्या हे आपले बलस्थान असताना, त्याच तरुणाईला या व्यसनाने ग्रासायला सुरुवात केली आहे. अंदाजे तीन कोटींहून अधिक भारतीय अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेले आहेत. विशेषतः 18 ते 35 या वयोगटातील तरुण याचा सर्वाधिक बळी ठरत आहेत. उत्तर भारतातून सुरू झालेली ही समस्या आता पश्चिम आणि दक्षिण भारतातही वेगाने पसरत आहे. तरीही हा सरकारला चिंतेचा विषय वाटत नसेल तर तो आपल्या सर्वांच्या चिंतेचाच विषय आहे.
महाराष्ट्रात या समस्येचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. भारतात आर्थिक क्षमता आहे, शहरीकरण आहे आणि ‘लाईफस्टाईल’चा दबाव आहे. पूलसाईड पार्ट्या, फार्महाऊस गॅदरिंग्स, ईडीएम नाईट्स (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक नाईट्स), अमुक मीट, तमुक जीटी अशा अनेक प्रकारांच्या आड ड्रग्जचा वापर होत असल्याचे ऐकायला मिळत आहे. गांजा, कोकेन, एमडी, एलएसडी यासारख्या पदार्थांची मागणी वाढते आहे. हे सगळे एका मोठ्या आणि संघटित साखळीच्या माध्यमातून चालते. आंतरराष्ट्रीय तस्कर, ड्रग्जचे वितरण करणारे लोक, स्थानिक वितरक, क्लब सर्किट आणि सरकारी व्यवस्थेतील भ्रष्ट मंडळींच्या भरवशावर हा कारभार दिवसागणिक वाढत चाललेला आहे. पोलिसांकडून किंवा अन्य तपास यंत्रणांकडून होणाèया कारवाया, जप्ती या सगळ्या गोष्टी वरवर पाहता प्रभावी वाटतात. पण त्या पुरेशा नाहीत, हे सिद्ध झालेले आहे. लहान मासे पकडले जातात, पण मोठे मासे सापडत नाहीत किंवा तसा प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे आपली व्यवस्था ड्रग्जविरोधी लढाईत पराभूत होत असल्याची भावना निर्माण होत आहे, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.
 
भारताने नक्षलवादासारख्या भीषण समस्येलाही मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणले. नक्षलवाद इतिहासजमा होत असल्याचे चित्र आहे. मग ड्रग्जच्या विरोधात तितक्याच कठोर इच्छाशक्तीने लढा का दिला जात नाही, हा खरा प्रश्न आहे. पण याचे उत्तर सोपे नाही. कारण या व्यवसायात पैसा प्रचंड आहे, लब्धप्रतिष्ठितांचा सहभाग आहे आणि त्याला रोखण्यासाठी लागणारी राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती अजूनही अपुरी आहे. ड्रग्जचा अवैध व्यापार हा अनेक इतर गुन्ह्यांशी जोडलेला आहे. महिला-बालकांचे लैंगिक शोषण, सायबर गुन्हे, दहशतवादासाठी निधी, संघटित गुन्हेगारी या सगळ्यांचा ड्रग्जच्या कारभाराशी संबंध आहे. म्हणजेच हा फक्त आरोग्याचा किंवा कायद्याचा प्रश्न नसून, तो सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. तुम्ही कोणताही गंभीर गुन्हा घ्या, त्याचा संबंध ड्रग्जशी असतोच असतो.
 
या सगळ्यात आपण एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित करतो आणि तो असा की, ड्रग्जची मागणी निर्माण होते कशी? त्याचे उत्तर असे की, आजचा तरुण प्रचंड तणावाखाली जगतो आहे. स्पर्धा, करीअरचा दबाव, सोशल मीडियावरचा दिखावा, एकटेपणा अशा अनेक गोष्टींमुळे तो मानसिकदृष्ट्या थकलेला आहे. त्याला या थकव्यापासून दिलासा हवा असतो आणि ड्रग्ज त्याला तात्पुरता दिलासा देतात. खरे तर ही त्याने स्वतःच्या आयुष्याला लावलेली आग असते. त्यात तो होरपळतो, त्याचे कुटुंब खाक होते आणि समाजाचेही नुकसान होते. वास्तव असे की, या समस्येने इतके गंभीर वळण घेतल्यावरही आपली शासन-प्रशासनाची व्यवस्था याबाबत फारशी गंभीर झालेली दिसत नाही. असा निष्कर्ष काढण्यासही हरकत नाही की, पोलिस किंवा नोकरशाही याबाबत फार काही करू शकणार नाही. त्याची कारणे अनेक आहेत. तरीही नक्षल्यांच्या विरोधात जशी सक्ती केंद्र सरकारने दाखविली, तशीच कठोरता याबाबत दाखविली जाणे आणि प्रतिबंधक यंत्रणांना कामाला जुंपणे आवश्यक आहे. मोठ्या ड्रग्ज सिंडिकेट्सवर थेट कारवाई झाली पाहिजे आणि त्यामागे असलेल्यांचे बुरखे फाडले पाहिजेत. छोट्या धाडींवर आणि जप्तीवर समाधान मानून हा प्रश्न संपणारा नाही. त्यासाठी निर्धारपूर्वक आणि दीर्घकालीन मोहीमच राबवावी लागणार आहे. यासंदर्भात सरकारची भूमिका जशी महत्त्वाची आहे, तशी प्रत्येक कुटुंबाचीही भूमिका महत्त्वाची आहे. आपली मुले कुठे जातात, कुणासोबत असतात, काय खातात-पितात, घरी आल्यावर कशी वागतात आणि कशी दिसतात, त्यांची पुरेशी झोप होते काय, अभ्यासात-कामात लक्ष आहे काय अशा सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे.cancer of addiction ड्रग्जच्या विळख्यापासून आपल्या युवा पिढीला वाचवायचे असेल तर मुलांच्या वर्तनातील बदल ओळखणे, त्यांच्या मित्रपरिवारावर लक्ष ठेवणे, संवाद कायम ठेवणे या गोष्टी अत्यावश्यक आहेत. स्पर्धा हे मानवी जीवनाचे वैशिष्ट्य आहे, हे मुलांना सांगतानाच यशाएवढेच अपयश देखील पचवण्याची शिकवण त्यांना देणे आता गरजेचे झाले आहे. यशाची व्याख्या केवळ पैसा, प्रतिष्ठा, पार्ट्या, नाईट आऊट्स आणि बाह्य दिखावा इतकीच मर्यादित असेल, तर हा प्रश्न कधीच संपणार नाही. स्पर्धेपेक्षा संतुलन, दिखाव्यापेक्षा समाधान आणि यशापेक्षा आनंद ही मूल्ये कुटुंबांत, मुलांमध्ये पुन्हा रुजवावी लागतील. परिस्थिती गंभीर आहे, पण हाताबाहेर गेलेली नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. परंतु, आपण सारे आता जागे झालो नाही, प्रतिकार सुरू केला नाही तर उद्या ही समस्या आपल्या नियंत्रणाबाहेर जाईल. कदाचित महाराष्ट्रही ‘उडता’ राज्य म्हणून कुप्रसिद्ध होईल. अमली पदार्थांविरुद्धची लढाई पोलिस व अन्य तपास यंत्रणांची तर आहेच. ती सरकारचीही आहे. सर्वांत महत्त्वाचे ती समाजाची लढाई आहे. कारण समाजाचे भवितव्य पणाला लागले आहे. अख्खी युवा पिढी नासवणारे हे व्यसन आहे आणि भविष्यातल्या अनेक पिढ्या नासवण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे ड्रग्जविरुद्धची ही लढाई कायदेशीर यंत्रणांखेरीत प्रत्येक घरात, प्रत्येक मनात लढली गेली पाहिजे. समाजाच्या नसांमध्ये हा कॅन्सर शिरत असताना इतर कुणीही आपले घर, आपला मुलगा-मुलगी यांना वाचवायला येणार नाही आणि काही विपरीत घडले तर आपण कुणालाही दोष देऊ शकणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.