नागपूर,
cbse-10th-result : पूर्वेश कापसे याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेत ९९.६ टक्के गुण मिळवत नागपूरचा नावलौकिक वाढविला आहे.

विशेष म्हणजे, त्याने कोणत्याही खासगी ट्युशनशिवाय हे यश संपादन केले आहे. तरुण भारतशी विशेष संवाद साधताना पूर्वेशच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे त्याने सांगितले. वडील मनीष कापसे हे प्राध्यापक असून आई वैशाली कापसे या गृहिणी आहेत. आई एमएससी गोल्ड मेडलिस्ट असून त्यांनी नोकरी सोडून मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. त्याची बहीण प्रियशा कापसे ही सध्या एम्स गुवाहाटी येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत असून, तीही राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली होती.पूर्वेशने दररोज सुमारे चार तास सातत्याने अभ्यास करत संकल्पनांवर आधारित शिक्षणावर भर दिला. “रोट लर्निंगपेक्षा विषय समजून घेणे महत्त्वाचे,” असे त्याचे मत आहे. अभ्यासादरम्यान तणाव आल्यास पालकांशी संवाद साधून तो कमी करत असल्याचेही त्याने सांगितले.शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची चिकाटी यांच्या जोरावर हे यश मिळाल्याचे तो नमूद करतो. पुढे इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करत JEE परीक्षा देण्याचा त्याचा मानस आहे.