तभा वृत्तसेवा
घाटंजी,
accident : तालुक्यातील साखरा (खुर्द) येथे मंगळवार, 14 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा महिन्यांच्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ आहे.
सविस्तर असे की, भीमजयंती निमित्त आदिलाबाद येथील साईकिरण गोडगुल्ला हे आपल्या कुटुंबासह साखरा येथे सिद्धार्थ रामटेके यांच्या घरी आले होते. कार्यक्रमानंतर रात्री ते आपल्या गावी परत जात असताना, गावालगतच्या आश्रमशाळेजवळ पांढरकवडा रोडवरील वळणावर हा अपघात झाला.
त्यांच्या टीजी03 इ7524 या स्विफ्ट डिझायर कार चालकाचा ताबा सुटला आणि समोरून येणाèया केए01 एमजी3987 क्रमांकाच्या बोरवेल ट्रकला कारची जबर धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, सहा महिन्यांची हंशिका गोडगुल्ला व तिचे वडील साईकिरण गोडगुल्ला (वय 30) यांचा जागीच मृत्यू झाला. तर हंशिकाची आई अनुष्का गोडगुल्ला (वय 25) गंभीर जखमी झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच गावकèयांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ रुग्णवाहिका बोलावली. तिघांनाही घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी वडील व चिमुकलीला मृत घोषित केले, तर गंभीर जखमी अनुष्का यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या दुर्घटनेनंतर साखरा परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांढरकवडा रस्त्यावरील धोकादायक वळण आणि अपूर्ण रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घाटंजीपांढरकवडा मार्गावरील रस्ता रुंदीकरणाची रखडलेली कामे कधी पूर्ण होणार आणि असे अपघात कधी थांबणार, असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मुज्जू पटेल व त्यांच्या सहकाèयांनी जखमी महिलेला तत्काळ यवतमाळ येथे हलविण्यास मदत केली. तसेच घटनेची माहिती पोलिसांना देऊन पुढील कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली आहे.