नागपूर,
diabetes-screening : सुईने रक्त घेऊन मधुमेह तपासण्याची पारंपरिक पद्धत आता मागे पडण्याची शक्यता असून, श्वासाच्या माध्यमातून मधुमेह तपासणी करणारे नाविन्यपूर्ण उपकरण विकसित करण्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यशस्वी ठरले आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागातील संशोधकांनी तयार केलेल्या ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाइस’ला यूके डिझाईन नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
मधुमेह हा जागतिक स्तरावर वाढता आजार असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक असते. पारंपरिक पद्धतीत रक्ताचे नमुने सुईद्वारे घेतले जातात, जे अनेक रुग्णांसाठी त्रासदायक ठरते. या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आलेले हे उपकरण श्वासाच्या विश्लेषणातून रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण मोजते, ज्यामुळे तपासणी प्रक्रिया अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेदनारहित ठरते.
या उपकरणाची संकल्पना ‘अविष्कार संशोधन महोत्सव २०२४’मध्ये सादर करण्यात आली होती. त्यावेळी हर्ष तिवारी यांच्या प्रकल्पाला नाविन्यपूर्णतेसाठी पुरस्कारही मिळाला होता. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही संकल्पना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त तंत्रज्ञानात रूपांतरित झाली आहे.
या प्रकल्पात विभागप्रमुख डॉ. वर्षा धुर्वे, हर्ष तिवारी आणि सबरीन मन्सुरी यांचे प्रमुख योगदान असून, विविध शैक्षणिक संस्थांतील तज्ज्ञांनीही सहकार्य केले आहे. या संशोधनातून आंतरसंस्थात्मक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रभावी उदाहरण समोर आले आहे.
सद्यस्थितीत उपकरण यशस्वीरीत्या विकसित झाले असून, त्याची अचूकता वाढवण्यासाठी कॅलिब्रेशन व व्हॅलिडेशन प्रक्रिया सुरू आहे. हे संशोधन आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, मधुमेह रुग्णांसाठी नियमित तपासणी अधिक सुलभ करण्यास मदत करणार आहे.